| माणगाव | प्रतिनिधी |
माणगावच्या मातीतून घडलेले दोन चिमुकले खेळाडू राष्ट्रीय पातळीवर झळकले आणि संपूर्ण तालुक्याचे नाव अभिमानाने उंचावले. बारामती येथे पार पडलेल्या खुल्या राष्ट्रीय तायक्वांदो अजिंक्यपद स्पर्धेत माणगाव शिक्षण प्रसारक मंडळाच्या दोन्ही शाळांतील विद्यार्थ्यांनी कष्ट, जिद्द आणि आत्मविश्वासाच्या बळावर सुवर्ण आणि कांस्य पदकांची ऐतिहासिक कमाई केली.
गणेश यशवंत वाघरे इंग्लिश मीडियम स्कूल, माणगाव येथील इयत्ता नववीतील मास्टर रुद्र दर्शना बेबिन नायर याने ज्युनियर 50 किलो वजन गटात अप्रतिम खेळ सादर करत सुवर्णपदक पटकावले. अंतिम फेरीत त्याने दाखवलेली चपळाई, अचूक किक्स आणि आत्मविश्वास पाहून प्रेक्षकही थक्क झाले. प्रत्येक सामन्यानंतर त्याच्या डोळ्यांत दिसणारी जिद्द आणि विजयाच्या क्षणी उमटलेले समाधानाचे हास्य हा क्षण माणगावसाठी अभिमानाचा ठरला.
मातोश्री गंगुबाई संभाजी शिंदे सीबीएसई स्कूल, माणगाव येथील इयत्ता सहावीतील आयान मोहम्मद अली लोखंडे याने सब-ज्युनियर 30 किलो वजन गटात दमदार लढत देत कांस्यपदक मिळविले. वय लहान असले तरी त्याच्या खेळातली परिपक्वता आणि धैर्य लक्षणीय होते. प्रत्येक फेरीत त्याने हार न मानता शेवटपर्यंत झुंज दिली आणि अखेर पदकावर आपले नाव कोरले. आयानच्या या कामगिरीने माणगावातील लहान मुलांनाही मोठी स्वप्ने पाहण्याची प्रेरणा दिली आहे.या दोन्ही खेळाडूंना तायक्वांदो प्रशिक्षक प्रतिक गायकवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.







