मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

बायपासच्या अपूर्ण कामाचा परतीच्या प्रवाशांना फटका; महामार्गावर 4 किमी रांगा

| माणगाव | प्रतिनिधी |

कोकणात गेलेल्या कोकणवासी व पर्यटक यांना परतीच्या प्रवासात प्रचंड वाहतूक कोंडीचा सामना करावा लागल्याने मुंबई-गोवा महामार्गावरील अपूर्ण कामांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले असल्यामुळे रविवारी महामार्गावर वाहनांची भीषण कोंडी झाली आणि हजारो प्रवाशांना उन्हात तासनतास अडकून राहावे लागले. मुंबई बाजूकडून कोकणात तसेच कोकणाकडून मुंबईकडे जाणाऱ्या मार्गावर सुमारे पाच किमी अंतरावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या, त्यामुळे माणगाव पासून दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी झाली होती. त्यामुळे संतप्त झालेल्या प्रवाशांनी शासन आणि ठेकेदाराच्या नावाने शिमगा साजरा करीत शिव्या आणि शापच दिला.

कोकण व तळकोकणातून मुंबईकडे परतणाऱ्या वाहनांचा प्रचंड लोंढा एकाच वेळी महामार्गावर आल्याने माणगाव परिसरात परिस्थिती हाताबाहेर गेली. माणगावपासून महाडकडे जाणाऱ्या मार्गावर तब्बल सहा किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. कार, एसटी बस, खासगी वाहने आणि मालवाहतूक गाड्या अशा सर्वच प्रकारची वाहने महामार्गावर थांबून राहिल्याने प्रवाशांचा अक्षरशः जीव मेटाकुटीला आला. त्यामुळे महामार्गावरच परतीच्या प्रवासाला निघालेल्या प्रवाशांनी शासनाच्या नावाने शिमगा साजरा केला. या वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळवण्यासाठी माणगाव पोलीस ठाण्याचे कर्मचारी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उन्हाची पर्वा न करता शर्थीचे प्रयत्न करत होते. काही ठिकाणी वाहतुकीचे मार्ग बदलून वाहनांना पर्यायी मार्गाने सोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र, वाहतुकीचा प्रचंड ताण इतका मोठा होता की अनेक ठिकाणी वाहने तासन्‌‍‍तास जागच्या जागीच अडकून पडली. कडक उन्हात गाड्यांमध्ये अडकून बसलेल्या प्रवाशांना पाणी, अन्न आणि इंधन, प्रसाधन गृह यांचाही मोठा प्रश्न निर्माण झाला होता. लहान मुले, महिला आणि ज्येष्ठ नागरिक यांना या परिस्थितीचा सर्वाधिक फटका बसल्याचे दिसून आले. अनेक प्रवाशांनी संताप व्यक्त करत महामार्गाच्या अपूर्ण कामांबाबत प्रशासन आणि सरकारवर तीव्र नाराजी
व्यक्त केली.

माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम पूर्ण झाले असते तर शहरातील बाजारपेठेतून जाणारी वाहतूक टळली असती आणि अशा प्रकारची भीषण कोंडी निर्माण झाली नसती, असे स्थानिक नागरिकांचे मत आहे. मात्र या बायपाससाठी गेल्या काही वर्षांत अनेक ठेकेदार बदलले गेले तरी प्रत्यक्ष काम मात्र अपेक्षित गतीने पुढे सरकलेले नाही. परिणामी प्रत्येक सणासुदीला आणि सुट्टीच्या काळात प्रवाशांना वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे. हा महामार्ग कोकणच्या विकासाचा दुवा मानला जात असताना त्याच महामार्गावरील अपूर्ण कामांमुळे प्रवाशांचे हाल होत असल्याची वस्तुस्थिती समोर येत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बायपासचे काम जोपर्यंत पूर्ण होत नाही तोपर्यंत अशी वाहतूक कोंडी कायम राहणार, अशी भीती व्यक्त होत आहे.

कोकणातून परतणाऱ्या हजारो प्रवाशांचा रविवारी मुंबई-गोवा महामार्गावर उन्हात जीव जडला. माणगाव आणि इंदापूर येथील बायपासचे काम वर्षानुवर्षे रखडल्याने महामार्गावर तब्बल सहा किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. कार, बस, मालवाहू गाड्यांसह सर्व वाहने तासनतास जागच्या जागी खिळून राहिली. कडक उन्हात पाणी, अन्न आणि इंधनाविना अडकलेल्या लहान मुले, महिला व ज्येष्ठ नागरिकांचे अतोनात हाल झाले. पोलिसांनी पर्यायी मार्ग सुचवण्याचे प्रयत्न केले, मात्र वाहतुकीचा प्रचंड ताण आवाक्याबाहेर गेला. संतप्त प्रवाशांनी महामार्गावरच शासन आणि ठेकेदाराच्या नावाने संताप व्यक्त केला. बायपास पूर्ण असते तर शहरातून जाणारी वाहतूक टळली असती, अनेक ठेकेदार बदलूनही प्रत्यक्ष काम मात्र रेंगाळतच राहिले. दीपावली सुट्ट्या, उन्हाळी सुट्ट्या, लग्नसराई, गणेश उत्सव, होळी उत्सव सणासुदीचे काळात दरवर्षी हीच परिस्थिती ओढवत असताना शासनाच्या घोषणा केवळ कागदावरच राहत असल्याचे स्पष्ट होत आहे.
Exit mobile version