एसटी महामंडळाचा बस खरेदीचा निर्णय
| मुंबई | वृत्तसंस्था |
राज्यातील ग्रामीण भागाची जीवनवाहिनी असलेल्या एसटी आणखी सक्षम होणार आहे. एसटी महामंडळाने 2,200 सध्या बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. या नवीन बस मार्च 2024 पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यात येणार आहेत. याकरिता एसटी महामंडळाने सोमवारी ई- निविदा प्रक्रिया सुरू करून अर्ज मागवले आहेत. महिला सन्मान योजना, अमृत ज्येष्ठ नागरिक योजनांमुळे एसटीची प्रवासी संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एसटीची वाढती प्रवासी संख्या बघता ताफ्यात नवीन बस येणे अनिवार्य आहे. मात्र गेल्या कित्येक वर्षांपासून नवीन बसची खरेदीच झाली नव्हती. त्यामुळे आता नवीन बस सेवेत आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या एसटी महामंडळाच्या ताफ्यात 16 हजार बस आहेत. यापैकी 12 हजार बस साध्या आहे. आता या सध्या बसच्या ताफ्यात 2,200 नव्या कोऱ्या साध्या एसटी बसची भर पडणार आहे. वर्ष 2023-24च्या अर्थसंकल्पात एसटीला डिझेलवरील साध्या बस घेण्यासाठी राज्य शासनाने 900 कोटी रुपयांची तरतूद केली आहे. 11 मीटर चेसिसवर बांधलेल्या 2,200 तयार परिवर्तन साध्या बस मार्च 2024 अखेर एसटीच्या ताफ्यात समाविष्ट होतील.
बस लवकरात लवकर प्रवाशांच्या सेवेत उपलब्ध व्हाव्यात यासाठी एसटी महामंडळाने थेट तयार बस घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात निविदा प्रक्रिया राबवली आहे. याशिवाय एसटी महामंडळाने 5,200 एसी इलेक्ट्रिक बस बांधणीचे कंत्राट ऑलेक्ट्रॉ कंपनीला देण्यात आले आहे. प्रोटोटाईप इलेक्ट्रिक बसची तपासणी चाचणी पूर्ण झाल्यावर या बस टप्प्याटप्प्याने जानेवारी 2024 अखेर ताफ्यात दाखल होणार सुरुवात होणार आहे.