काळ नदी आटल्याने 100 गावांवर भीषण पाणीसंकट
| माणगाव | सलीम शेख |
माणगाव तालुक्याची जीवनवाहिनी मानली जाणारी काळ नदी यंदा पूर्णपणे कोरडी पडल्याने तालुक्यावर अभूतपूर्व पाणीसंकटाचे सावट गडद झाले आहे. सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावणाऱ्या या नदीच्या पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नसल्याचे विदारक चित्र सध्या पाहायला मिळत आहे. परिणामी माणगाव, निजामपूर, गोरेगाव, इंदापूर, लोणेरेसह सुमारे 100 गावांमधील नागरिकांवर पिण्याच्या पाण्याचे गंभीर संकट ओढवले आहे.
एकेकाळी वर्षभर वाहणारी काळ नदी आज पूर्णपणे आटल्याने हजारो कुटुंबांच्या जीवनावर परिणाम झाला आहे. नदीचे विस्तीर्ण पात्र उघडे पडले असून, ठिकठिकाणी भेगा पडलेल्या जमिनी आणि कोरडे दगडच दिसत आहेत. नदीवरील अवलंबित्व असलेल्या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यासाठी वणवण सुरू झाली असून, नागरिक, शेतकरी आणि पशुपालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
काळ नदीसोबतच गोद नदीचीही अवस्था दयनीय झाली आहे. विहिरी, तलाव, ओढे, नाले आणि पारंपरिक जलस्रोतांनी तळ गाठला आहे. अनेक गावांमध्ये पाण्याचा एक थेंब मिळणेही कठीण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे जमिनीला भेगा पडल्या असून, ग्रामीण भागातील जनजीवन विस्कळीत होऊ लागले आहे.
या संकटाची सर्वाधिक झळ माणगाव शहराला बसण्याची शक्यता आहे. सुमारे 30 हजार लोकसंख्या असलेल्या शहरासह परिसरातील गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत चालला आहे. पाणीपुरवठ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या नदीकाठच्या उपसा विहिरीदेखील आटण्याच्या मार्गावर आहेत. या विहिरींमधील गाळ तातडीने काढला नाही तर शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेवर मोठा परिणाम होऊ शकतो.
दुर्गम भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असला तरी तो अपुरा ठरत आहे. महिला, ज्येष्ठ नागरिक आणि लहान मुलांना पाण्यासाठी लांब अंतर पायी जावे लागत आहे. अनेक गावांमध्ये नागरिक चातक पक्ष्यासारखी पावसाची वाट पाहात आहेत. दरम्यान, काळ प्रकल्पाच्या कालव्यातून सोडण्यात आलेले पाणी काही प्रमाणात आधार देत आहे. जनावरे, चारा आणि शेतीच्या गरजांसाठी हे पाणी उपयोगी पडत असले तरी पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायम आहे. येत्या काही दिवसांत समाधानकारक पाऊस न झाल्यास परिस्थिती अधिक गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे.
काळ नदीचे कोरडे पडलेले पात्र हा केवळ पर्यावरणीय इशारा नसून हजारो कुटुंबांच्या अस्तित्वाशी निगडित गंभीर प्रश्न बनला आहे. त्यामुळे प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून पर्यायी पाणीपुरवठा, जलस्रोतांचे पुनरुज्जीवन आणि गाळ काढण्याच्या कामांना गती द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
धोक्याची घंटा!
काळ नदी पूर्णपणे कोरडी
सुमारे 100 गावांवर पाणीटंचाईचे संकट
30 हजार लोकसंख्येच्या माणगाव शहराला फटका
उपसा विहिरी आटण्याच्या मार्गावर
टँकरवर वाढती मदार
एक-दोन दिवसाआड पाणीपुरवठ्याची शक्यता
शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
कडक उन्हामुळे शेतातील पिके करपली आहेत. जनावरांसाठी चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. ओढे-नाले सुकल्याने शेतीसह दुग्धव्यवसायालाही मोठा फटका बसत आहे. पावसाने लवकर हजेरी लावली नाही तर ग्रामीण अर्थव्यवस्थेवर त्याचे गंभीर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
प्रशासनासमोर मोठे आव्हान
नागरिकांनी प्रशासनाकडे जलस्रोतांमधील गाळ काढणे, टँकर फेऱ्या वाढविणे, पर्यायी पाणीपुरवठा योजना सुरू करणे आणि जलसंधारणाच्या उपाययोजनांना गती देण्याची मागणी केली आहे. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापूर्वी तातडीने पावले उचलण्याची गरज व्यक्त होत आहे.
