| रायगड | खास प्रतिनिधी |
कृषीवल हळदीकुंकू म्हणजे केवळ वाण लुटण्याचा कार्यक्रम नाही, तर त्यातून स्त्रियांतील समतेचा संदेश देण्याचा प्रयत्न कृषीवलने केला. कारण महिलांचा सन्मान हाच कृषीवलचा अभिमान.

स्टार प्रवाहवरील मालिकांच्या माध्यमांतून घराघरांत पोहोचलेल्या कलाकारांची उपस्थिती, वाण लुटण्यासाठी आलेल्या महिलांची अलोट गर्दी, ढोल-ताशांच्या गजरात झालेलं जंगी स्वागत, शिस्तबद्ध नियोजनामुळे आलेला उत्साह….हे सारं मंत्रमुग्ध करणारे वातावरण पहायला मिळालं ते कृषीवल हळदीकुंकू सोहळ्यात.
अलिबाग पीएनपी नाट्यगृहाच्या पटांगणावर कृषीवल आयोजित हळदीकुंकू समारंभ दिमाखात पार पडला. पूर्वी चूल आणि मूल एवढेच स्त्रियांचे कार्यक्षेत्र होते. मात्र कृषीवल हळदीकुंकवाच्या निमित्ताने चार भिंतीच्या आत कोंडल्या गेलेल्या स्त्रियांना बाहेर पडता येऊ लागले. आता परिस्थिती बदलली असली तरी, हळदीकुंकवाच्या प्रथेला मात्र अजूनही तितकेच महत्त्व आहे. कृषीवलनेही ही परंपरा गेली 30 वर्षे अखंडितपणे जपली आहे.

महाराष्ट्र राज्यातील महिलांमध्ये कृषीवलचा हळदीकुंकू हा कार्यक्रम अतिशय लोकप्रिय झाला आहे. आता तो वेगळ्याच उंचीवर पोहोचला आहे. अलिबाग येथे जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून हजारो महिलांनी वाण लुटण्यासाठी प्रचंड गर्दी केली होती. जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सुप्रिया पाटील यांनी दिपप्रज्वलन केल्यानंतर स्व. नारायण नागू पाटील, स्व. प्रभाकर पाटील, स्व.अॅड. दत्ता पाटील, स्व.सुलभा पाटील, स्व. मीनाक्षी पाटील, स्व. नमिता नाईक यांच्या प्रतिमेपुढे पहिले वाण अर्पण करण्यात आले. याप्रसंगी शेकाप महिला राज्य आघाडी प्रमुख अॅड. मानसी म्हात्रे, शेकाप महिला आघाडीच्या जिल्हा प्रमुख चित्रलेखा पाटील, अॅड. निता पाटील, अलिबागच्या माजी नगराध्यक्षा सुनिता नाईक, साधना पाटील, वृषाली ठोसर, संजना किर, तालुका महिला आघाडीचे सर्व पदाधिकारी, स्ट्रार प्रवाह वाहिनीचे हितेश आढाव, सोनाली शिगवण, पटेल ज्वेलर्सच्या प्रतिक्षा डायस, रामबंधू मसाले कंपनीचे सुरेश सणस आणि संतोष गुजर, ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, पीएनपीचे मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर अधिकारी, कर्मचारी यांच्या उपस्थित महिलांनी वाण लुटले.
स्ट्रार प्रवाह वाहिनीवरील येड लागलं प्रेमाचं या लोकप्रिय मालिकेतील मंजिरीची भूमिका साकारणारी पुजा बिरारी, साधी माणस मालिकेतील सत्या म्हणजे आकाश नलावडे आणि मीरा म्हणजेच शिवानी बावकर, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर हे सर्व कलाकार या कार्यक्रसाठी उपस्थित होते.
महिलांच्या अलोट उत्साहाला आले उधाण
अफालातून उखाणे, विविध मनोरंजनाच्या कार्यक्रमाने धमाल अफालातून उखाणे, विविध मनोरंजनाचे कार्यक्रम आणि महिलांच्या अलोट उत्साहाला उधाण आले होते. निमित्त होते ते कृषीवलच्या हळदीकुंकू कार्यक्रमाचे. स्ट्रार प्रवाह वाहिनीवीर साधी माणस मालिकेतील सत्या म्हणजे आकाश नलावडे आणि मीरा म्हणजेच शिवानी बावकर, येड लागलं प्रेमाचे लोकप्रिय मालिकेतील मंजिरीची भूमिका साकारणारी पुजा बिरारी, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेतील काव्या म्हणजेच ज्ञानदा रामतीर्थकर यांनी कार्यक्रमात चांगलीच जान आणली.
नेहमीच चूल फुंकणार्या आणि कुटूंबासाठी राबणार्या महिलांनी आज स्वतःसाठी वेळ काढून कृषीवल आयोजित हळदीकुंकू कार्यक्रमात सहभाग घेतला. मनमुरादपणे त्यांनी धमाल, मस्ती करत दिवस मानाचा, दिवस सौभाग्याचा हि बिरुद अखेर खरे ठरवले. दुपारी तीन वाजल्यापासूनच जिल्ह्याच्या कानाकोपर्यातून महिलांनी कार्यक्रमाला गर्दी केली होती. ढोलताशाच्या गजरात महिलांनी मनमुरादपणे ठेका धरला. पारंपारिक पेहराव करीत काही महिलांनी सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. हजोरोंच्या संख्येने आलेल्या महिलांनी पीएनपी नाट्यगृहाचा परिसर खुलून गेला होता.
दुपारी सुरु झालेल्या कार्यक्रमाला जिल्ह्याच्या विविध भागातून महिला आल्या होत्या. प्रत्येकीची चेहर्यावर वाण लुटण्याचा आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाच्या आयोजक चित्रलेखा पाटील यांना उपस्थित महिला धन्यवाद देत होते. त्यामध्ये तरुण महिलांसह ज्येष्ठ महिलांचाही समावेश होता.
विजयी स्पर्धकांना आकर्षक बक्षीस
उखाणे घेण्याच्या स्पर्धेमध्ये महिलांनी हिरीरीने भाग घेतला. निवेदक प्रतिम सुतार यांनी सहभागी महिलांना एका डब्यातून चिठ्ठी काढण्यास सांगितली. त्यामध्ये विविध शब्द देण्यात आले होते. त्याचा वापर करुन महिला स्पर्धकांनी उखाणे घ्यायचे होते. मात्र ठराविक वेळेत उखाणा काही स्पर्धकांना आला नाही. त्यामुळे त्या नियमानुसार स्पर्धेच्या बाहेर गेल्या. विजयी स्पर्धकांना पटेल ज्वेलर्सतर्फे एक आकर्षक बक्षिस देण्यात आले.
कलाकार आकाश नलावडे, शिवानी बावकर, पुजा बिरारी, ज्ञानदा रामतीर्थकर आणि पटेल ज्वेलर्सच्या प्रतिक्षा डायस यांच्या हस्ते विजयी स्पर्धकांना सन्मानित करण्यात आले.
मराठी आणि इंग्रजी आकड्याच्या खेळामध्ये बर्याच महिलांची फसगत झाली. परंतु त्यांनी हा खेळ चांगलाचा एन्जॉय केला. या स्पर्धेतील विजयी महिला स्पर्धकांनाही आकर्षक बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. हळदीकुंकू समारंभ नव्हे तर मनोरंजनाचा खेळ खेळण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली. त्यानंतर गाणे ओळखून त्यावर तसेच्या तसे नृत्य करण्याची स्पर्धा पार पडली. यावेळी सहभागी महिलांनी धमाल नृत्य करुन उपस्थितांची मने जिंकली. काही गाण्यावर स्पर्धकांना नाचता न आल्याने आकाश नलावडे, शिवानी बावकर, पुजा बिरारी, ज्ञानदा रामतीर्थकर यांनी त्यांच्यासोबत नृत्य करुन चांगलीच धमाल उडवून दिली. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते आर्कषक बक्षीस देण्यात आली.