खरेदी, खाद्यसंस्कृती आणि मनोरंजनाची पर्वणी
| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग शहरात पुन्हा एकदा उत्साह, आनंद आणि चैतन्याची लाट उसळली आहे. स्थानिक नागरिकांना एकाच छताखाली विविध वस्तूंची खरेदी, चटकदार खाद्यपदार्थ आणि भरगच्च मनोरंजनाचा अनुभव मिळावा, यासाठी लायन्स क्लब अलिबागच्या वतीने भव्यदिव्य अशा लायन्स महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. हा पाच दिवसीय महोत्सव सोमवार, दि. 27 जानेवारीपर्यंत अलिबागमध्ये रंगणार आहे.
या महोत्सवाचा दिमाखदार शुभारंभ शुक्रवारी (दि. 23) सायंकाळी मोठ्या जल्लोषात पार पडला. यावेळी अलिबागच्या नगराध्यक्षा अक्षया नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत उद्घाटन करण्यात आले. यावेळी लायन्स इंटरनॅशनल डायरेक्टर पंकज मेहता, नगरपरिषदेचे वीज व बांधकाम सभापती प्रशांत नाईक, रायगड बाजारचे चेअरमन नृपाल पाटील, नगरसेवक प्रदीप नाईक, भगवान मालपाणी, प्रवीण सरनाईक, अनिल म्हात्रे, महेंद्र पाटील, संतोष पाटील, नयन कवळे, रमेश धनावडे तसेच लायन्स क्लबचे पदाधिकारी, सदस्य आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मान्यवरांच्या आगमनावेळी ढोल-ताशांच्या गजरात स्वागत करण्यात आले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी विविध स्टॉल्सची पाहणी केली. ग्राहकांना एकाच ठिकाणी सर्व प्रकारच्या वस्तू आणि खाद्यपदार्थांची सोय उपलब्ध करून दिल्याबद्दल आयोजकांचे उपस्थितांनी विशेष कौतुक केले. या महोत्सवामध्ये पावणेदोनशेहून अधिक स्टॉल्स ग्राहकांच्या सेवेत उपलब्ध असून, विविध प्रकारच्या वस्तूंसह चवदार व्हेज आणि नॉनव्हेज खाद्यपदार्थांचे स्टॉल्स खवय्यांसाठी आकर्षण ठरत आहेत. सायंकाळपासूनच महोत्सव परिसरात ग्राहकांची मोठी गर्दी पाहायला मिळत असून, खरेदीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
महोत्सवाच्या पाचही दिवसांत नागरिकांच्या मनोरंजनासाठी विविध सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. उद्घाटनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजता कराओके स्पर्धेची अंतिम फेरी पार पडली. विविध गायकांनी मराठी व हिंदी गाण्यांच्या सादरीकरणातून प्रेक्षकांची मने जिंकली.
शनिवार, दि. 24 रोजी दुपारी साडेतीन वाजता ‘मम्मी सुगरण’ पाककला स्पर्धा, तर सायंकाळी सहा वाजता ग्रुप डान्स स्पर्धा होणार आहे. रविवार, दि. 25 रोजी दुपारी साडेतीन वाजता ‘खेळ पैठणीचा’ आणि सायंकाळी सहा वाजता शरीरसौष्ठव स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. सोमवार, दि. 26 रोजी सायंकाळी पाच वाजता पेट अँड ब्रीड शो, तर रात्री आठ वाजता स्टँडअप कॉमेडी कार्यक्रम रंगणार आहे. महोत्सवाची सांगता मंगळवार, दि. 27 रोजी साडेपाच वाजता होणार असून, सायंकाळी सात वाजता इंडिएसा बँडचा धमाकेदार कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. एकूणच खरेदी, खाद्यसंस्कृती आणि भरगच्च मनोरंजन यांचा संगम साधणारा लायन्स महोत्सव अलिबागकरांसाठी पर्वणी ठरत असून, नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
