मुख्य आरोपी अद्याप पोलिसांपासून दूर
जामिनांवरून न्यायालयीन घडामोडींना वेग
| पेण | प्रतिनिधी |
पेण तालुक्यातील बोरगाव हद्दीतील सेलिब्रेशन रिसॉर्टवर 23 मार्च रोजी पेण पोलिसांनी टाकलेल्या धाडीत उघडकीस आलेल्या कुंटणखाना प्रकरणाला आता दोन महिने पूर्ण झाले असून, अद्यापही या प्रकरणातील न्यायालयीन आणि पोलिसीय कारवाई सुरूच आहे. या कारवाईत तीन महिलांची सुटका करण्यात आली होती, तर घटनास्थळावरून चार जणांना ताब्यात घेण्यात आले होते. या चार जणांजवळून पोलिसांना मिळालेल्या माहिती नुसार या प्रकरणात सुनील मेहता, गणेश अण्णा, राजू मंडल आणि गणेश गायकर या चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर आरोपींकडून जामिनासाठी विविध न्यायालयांत प्रयत्न सुरू झाले.
यामध्ये गणेश अण्णा, राजू मंडल आणि गणेश गायकर यांनी अलिबाग जिल्हा न्यायालय येथे जामिनासाठी अर्ज दाखल केला होता. मात्र जिल्हा सत्र न्यायालयाने त्यांचे अर्ज फेटाळून लावले. त्यानंतर राजू मंडल आणि गणेश गायकर यांनी मुंबई उच्च न्यायालय येथे धाव घेतली. उच्च न्यायालयाने राजू मंडल यांचा जामीन अर्ज नाकारला, तर गणेश गायकर यांना काही अटी व शर्तींसह जामीन मंजूर करण्यात आला.
गणेश गायकर यांना मंजूर करण्यात आलेल्या जामिनातील महत्त्वाची अट म्हणजे संबंधित कुंटणखाना प्रकरणात असलेल्या आरोपी व्यक्तींशी सेलिब्रेशन रिसॉर्ट चालवायला देण्याच्या प्रत 12 मेपूर्वी पोलीस ठाण्यात जमा करणे आवश्यक होते. मात्र, आजपर्यंत संबंधित कागदपत्रे जमा करण्यात आलेली नसल्याने पेण पोलिसांनी गणेश गायकर यांचा जामीन रद्द करण्याची मागणी न्यायालयाकडे केल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी मानला जाणारा सुनील मेहता हा उत्तर प्रदेशात असल्याची माहिती असून, तो अद्याप पोलिसांच्या हाती लागलेला नाही. इतर आरोपींकडूनही न्यायालयीन दिलासा मिळवण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे समजते. मात्र गणेश अण्णा आणि राजू मंडल यांना केव्हाही अटक होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.






