30,288 प्रकरणे निकाली 15 कोटींची तडजोड रक्कम वसूल
। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
न्यायालयात वर्षानुवर्षे बाद करीत बसून वेळ, पैसा आणि ताकद खर्च करण्यापेक्षा दोन्ही पक्षांनी सामंजस्याची भूमिका घेऊन लोक न्यायालयात समेट घडवावा, असा प्रवाह भारतीय न्यायालयांच्या इतिहासात गेल्या दशकात प्रकर्षाने रूढ झालेला आहे. रायगड जिल्ह्यात झालेल्या लोकन्यायालयात अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली असून वादपूर्व व दाखल अशी एकूण 30,288 प्रकरणे सामंजस्याने मिटवण्यात यश आले आहे असे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा न्यायाधिश संदीप स्वामी यांनी माहिती दिली.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय दिल्ली यांच्या निर्देशाप्रमाणे संपूर्ण भारतभर राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये न्यायालयांतील प्रलंबित प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल होण्यापूर्वीची प्रकरणे ठेवण्यात आली होती. रायगड जिल्ह्यातील विविध न्यायालयात 40 लोक अदालतीचे कक्ष स्थापन करण्यात आले होते. लोक अदालतीमध्ये पक्षकारांना न्यायालयात येण्याची सक्ती न करता व्हिडीओ कॉलचा वापर करूनसुध्दा प्रकरणे मिटविण्यात आली. या लोक न्यायालयाल यशस्वी करण्यासाठी सर्व न्यायिक अधिकारी, वकील वर्ग, जिल्हा परिषद, रायगड, पोलीस अधिक्षक रायगड व सर्व पोलीस कर्मचारी, सर्व पक्षकार यांनी भरघोस प्रतिसाद दिल्याबद्दल जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा इंगळे व न्यायाधिश तथा सचिव संदीप स्वामी यांनी सर्वांचे आभार मानले आहेत.
अदालतीत 88 हजार प्रकरणे
जिल्हा व सत्र न्यायाधीश विभा प्र. इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित केलेल्या राष्ट्रीय लोक अदालतीमध्ये जिल्ह्यातील दाखलपूर्व व प्रलंबित अशी एकूण 88,767 प्रकरणे लोक अदालतीमध्ये ठेवण्यात आली होती. त्यापैकी दाखलपूर्व 29,377 व प्रलंबित प्रकरणांपैकी 911 प्रकरणे अशी एकूण 30,288 प्रकरणे सामंजस्याने मिटवून लोक अदालतीमध्ये निकाली निघाली व त्याद्वारे पक्षकारांना एकूण 14 कोटी 99 लाख 91 हजार 609 रूपयाची तडजोड रक्कम मिळवून देण्यात आली.
दहा जोडप्यांचा संसार जुळला
उरण येथील लोकन्यायालयात 2 जोडपी, पेण येथील लोकन्यायालयात 3 जोडपी, महाड येथील लोकन्यायालयात 3 जोडपी, खालापूर व रोहा येथे प्रत्येकी 1 जोडपी सामंजस्याने वाद मिटल्यामुळे नांदायला गेली. त्या पक्षकारांचा पॅनलवरील न्यायधिशांनी पुष्प देत सत्कार केला व भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.