14 ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान लढत; 11 हजारांहून अधिक सुरक्षारक्षक तैनात
| अहमदाबाद | वृत्तसंस्था |
भारत-पाकिस्तान यांच्यामधील एकदिवसीय विश्वचष स्पर्धेतील लढत 14 ऑक्टोबरला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार आहे. दोन पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमधील लढतीची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. आशिया खंडातील दोन शेजारी देशांमधील लढतीला युद्धाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. तसेच नरेंद्र मोदी स्टेडियमला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या लढतीसाठी 11 हजारांपेक्षा जास्त सुरक्षा रक्षक तैनात करण्यात येणार आहेत.
एका वृत्तानुसार, मुंबई पोलिसांना ई-मेल आला असून, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियम उडवून टाकण्याची धमकी देण्यात आली. ज्या व्यक्तीकडून ई-मेल पाठवण्यात आला, त्या व्यक्तीने 500 कोटी रुपयांची मागणी केली आहे. तसेच गुंड लॉरेंस बिश्नोई यांची तुरुंगातून सुटका करण्याचीही मागणी केली. या ई-मेलबाबत अहमदाबादमधील पोलीस आयुक्त जी. एस. मलिक यांनी सांगितले की, “आम्ही अशा धमक्यांचे मूल्यांकन केले आहे. त्यानुसार आम्ही योजना तयार केली आहे. शिवाय सामना पाहण्यासाठी एक लाखाहून अधिक प्रेक्षक येणार असताना विस्तृत सुरक्षा व्यवस्था आवश्यक आहे. हा एक संवेदनशील सामना असेल. यामुळे जातीय तेढ निर्माण होऊ शकते हेदेखील आम्ही लक्षात घेतले.” दरम्यान, हा ई-मेल परदेशातून आलेला आहे, अशी माहिती मिळाली असली तरी अहमदाबादमधील शहर पोलीस कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी सज्ज आहेत, असे त्यांच्याकडून सांगण्यात आले.
मलिक पुढे म्हणाले, सात हजारांहून अधिक पोलीस कर्मचाऱ्यांसह स्टेडियमच्या सुरक्षिततेसाठी आणि सामन्यादरम्यान शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जवळपास चार हजार होमगार्ड तैनात करण्यात येणार आहेत. या जवानांव्यतिरिक्त तीन ‘हिट टीम’चीही व्यवस्था असणार आहे. एनएसजीची एक ड्रोन विरोधी टीम, बॉम्बशोधक आणि निकामी पथकाच्या नऊ पथकांचीही निवड करण्यात आली आहे.
स्टेडियममध्ये तालीम सुरू
राज्य राखीव पोलिसांच्या 13 कंपन्यांव्यतिरिक्त आम्ही आमच्या सुरक्षा विभागाच्या रॅपिड ॲक्शन फोर्सच्या तीन कंपन्या तैनात करणार आहोत. आरएएफद्वारे शहरातील सांप्रदायिकदृष्ट्या संवेदनशील भागांवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. चेंगराचेंगरीच्या वेळी लोकांना मदत करण्यासाठी आधीच योजना तयार केली आहे. स्टेडियममध्ये याची तालीमदेखील सुरू आहे, असे मलिक यांनी स्पष्ट केले.
