नवरात्रीमुळे 14 ऑक्टोबरला होणार लढत
| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकात भारतीय संघाला पाकिस्तानचा सामना करावा लागणार आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर 15 ऑक्टोबरला दोन्ही संघ आमनेसामने असतील. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने विश्वचषक सामन्यांचे वेळापत्रक गेल्या महिन्यात जाहीर केले आहे. परंतु यावर्षीच्या वर्ल्डकप स्पर्धेतील सर्वात प्रतिष्ठित सामन्यांपैकी भारत-पाकिस्तान या बहुचर्चित महामुकाबल्याच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या सामन्यासाठी ज्या क्रिकेट चाहत्यांनी बुकिंग केले असेल त्यांचे टेन्शन वाढणार आहे.
भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याची तारीख बदलली जाऊ शकते. वास्तविक, ज्या दिवशी दोन्ही संघांमध्ये हा हायवोल्टेज सामना होणार आहे, तो दिवस नवरात्रीचा पहिला दिवस आहे. गुजरातमध्ये रात्रभर गरबा नृत्याने साजरा केला जातो. सुरक्षेच्या कारणास्तव एजन्सींनी बीसीसीआयला सामना इतर तारखेला हलवण्याचा सल्ला दिला आहे. वृत्तसंस्था एएनआयने दिलेल्या वृत्तानुसार हा सामना नियोजित वेळेच्या एक दिवस अगोदर 14 ऑक्टोबर रोजी होऊ शकतो. मात्र, याबाबत कुठलीही अधिकृत माहिती देण्यात आली नाही.
हॉटेल्स आधीच बुक
बीसीसीआय सुरक्षा यंत्रणांच्या सल्ल्याचाही विचार करत असून लवकरच अंतिम निर्णय घेतला जाईल. अशा प्रसंगी भारत विरुद्ध पाकिस्तान यासारखे हाय-प्रोफाइल सामने टाळावेत, असे एजन्सींनी बोर्डाला सांगितले आहे. या सामन्यासाठी हजारो-लाखो चाहते अहमदाबादला पोहोचणार आहेत. जर सामन्याचे वेळापत्रक बदलले तर चाहत्यांचे मोठे हाल होऊ शकतात. त्यांनी प्रवासाचे आराखडे आधीच निश्चित केले आहेत. त्या सामन्यासाठी अहमदाबादमधील जवळपास सर्व हॉटेल्स बुक झाली आहेत. चाहत्यांनीही रूग्णालयात बेडसाठी संपर्क साधला आहे.
तिकीट विक्रीबाबत अपडेट नाही
वेळापत्रकात बदल झाल्यास मोठ्या प्रमाणावर हॉटेल बुकिंग रद्द होण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे या स्पर्धेचा सलामीचा सामनाही इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात 5 ऑक्टोबरला होणार आहे. स्पर्धेसाठी दोन महिन्यांहून अधिक कालावधी शिल्लक आहे, परंतु अद्याप तिकीट विक्रीचे कोणतेही अपडेट नाही. त्यामुळे चाहत्यांची निराशा वाढली आहे. भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अंतिम निर्णय घेतल्यानंतर बीसीसीआय तिकिटांची विक्री सुरू करेल, असे मानले जात आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी सर्व यजमान स्थळांच्या सदस्यांना 27 जुलै (गुरुवार) रोजी नवी दिल्ली येथे बैठकीसाठी एकत्र येण्यास सांगितले आहे. जेथे भारत-पाकिस्तान सामन्याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर वर्ल्ड कपमधील चार साखळी सामने होणार आहेत. 19 नोव्हेंबरला स्पर्धेचा अंतिम सामनाही तिथेच होणार आहे.
सर्व राज्य संघटनांना पत्र पाठवले आहेत. मला वाटते की, आम्ही माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी पुन्हा भेटणे आवश्यक आहे. वेगवगळ्या विषयांवर चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी आवश्यक असलेल्या कोणत्याही मुद्द्यांचा आढावा गरजेचे आहे आणि हे सर्व संबंधितांच्या हिताचे असेल. विश्वचषकाचे आयोजन जी शहरे करणार आहेत त्या ठिकाणच्या संघटनांना या बैठकीला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली आहे.
जय शाह,बीसीसीआय सचिव