परदेशी पाहुण्यांची संख्या रोडावली

विकासाच्या नावाखाली समुद्रकिनारी भराव; पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट झाल्याने भटंकती

| चिरनेर | वार्ताहर |

उरण समुद्रकिनार्‍यावर पूर्वी परदेशी पाहुणे म्हणजेच विविध जातीचे पक्षी येत असत. मात्र, गेल्या काही दिवसात येथे विकासाच्या नावाखाली समुद्रकिनारी मोठ्या प्रमाणात भराव सुरू आहे. त्यामुळे, या पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. परिणामी, त्यांची संख्या सध्या रोडावली आहे. निसर्गप्रेमी, प्रक्षीप्रेमींकडून याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे.

येथील खाडी किनार्‍यावरील पाणवठ्यामध्ये मुबलक व सकस आहार त्याचबरोबर पोषक वातावरण असल्याने येथे येणार्‍या पर्यटक पक्ष्यांसाठी येथील वातावरण पोषक ठरत असे. मात्र, उरण तालुक्यात एकमेव शिल्लक राहिलेले पक्ष्यांचे ठिकाण म्हणजे पाणथळी, मात्र सध्या ही पाणथळी ठिकाणी पाण्याअभावी कोरडी पडल्याने निवारासाठी येथे दरवर्षी थांबणार्‍या परदेशी पक्ष्यांची मात्र भटकंती सुरू झाली आहे. येथे काही पक्षी उपजीविकेसाठी येतात, तर काही पक्षी येथे अंडी व पिल्ले घालण्यासाठी येतात. हजारो किलोमीटर प्रवास करून दरवर्षी हे पक्षी आपल्या ठरलेल्या जागेवर येतात. मात्र, यावर्षी नेमके या पक्ष्यांच्या आगमनाच्या काळातच ही पाणस्थळी सुकल्याने या पक्ष्यांची मोठी पंचायत झाली आहे. अन्नाच्या व पाण्याच्या शोधात येथे आलेल्या परदेशी पक्ष्यांची तडफड सुरू आहे.

उरण तालुका हा निसर्गाने नटलेला व सर्व संपन्न तालुका होता. मात्र विकासाच्या नावाखाली हाच तालुका आता भकास होऊ लागला आहे. खास उरण तालुक्यात येथे येणार्‍या फ्लेमिंगो, पेंटड, स्टोरख् ईबीस, ओपन हेड बिल यासारख्या पक्ष्यांमुळे वन्यजीवप्रेमी, पक्षीप्रेमी व पक्षी निरीक्षकांमध्ये प्रसिद्ध होते. तालुक्यातील भेंडखळ, सावरखार, पागोटे, बेलपाडा, दास्तान फाटा या पाणथळी जागेवर भराव झाल्यामुळे अगोदरच येथील पक्ष्यांची आश्रयस्थाने नष्ट झाली आहेत. त्यात आता पाणजे पाणथळ सुकविल्याने पक्षीप्रेमींमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.

Exit mobile version