आजपासून पॅरालिम्पिकला सुरुवात

| नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
टोक्यो ऑलिम्पिकमधील भारतीय खेळाडूंच्या ऐतिहासिक यशानंतर आता देशातील सर्व क्रीडाप्रेमींना टोकियो पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेची उत्सुकता आहे. दि. 24 ऑगस्ट ते 5 सप्टेंबरदरम्यान रंगणार्‍या या स्पर्धेत भारताचे 54 क्रीडापटू नऊ क्रीडाप्रकारांत आपापले कौशल्य दाखवणार आहेत.
1968मध्ये प्रथमच पॅरालिम्पिक स्पर्धामध्ये भारताने सहभाग नोंदवला. त्यानंतर यंदा 12व्यांदा भारतीय क्रीडापटू पॅरालिम्पिकमध्ये सहभागी होत असून, प्रथमच 54 खेळाडूंचे पथक भारताने टोक्योसाठी धाडले आहे. तिरंदाजी, अ‍ॅथलेटिक्स, कॅनोइंग, बॅडमिंटन, पॉवरलिफ्टिंग, नेमबाजी, जलतरण, टेबल टेनिस आणि तायक्वांदो अशा नऊ प्रकारांत भारताचे खेळाडू खेळणार आहेत.

भारतीय पॅरालिम्पिक समितीचे सरचिटणीस गुरशरण सिंग यांनी काही दिवसांपूर्वीच यंदाचे पॅरालिम्पिक भारताच्या इतिहासातील सर्वोत्तम ठरेल, असे मत व्यक्त करतानाच भारतीय खेळाडूंकडून पाच सुवर्णासह एकूण 15 पदकांची अपेक्षा असल्याचे सांगितले. त्यानुसार दोन वेळचा सुवर्णपदक विजेता भालाफेकपटू देवेंद्र झझारिया, उंच उडीपटू मरियप्पन थंगवेलू, बॅडमिंटमध्ये प्रमोद भगत, पारुल परमार, नेमबाजीत दीपक सैनी, रुबिना फ्रान्सिस यांच्याकडून पदकाची सर्वाधिक आशा आहे. अर्जुन पुरस्कार विजेता जलतरणपटू सुयश जाधववर महाराष्ट्रातील क्रीडाप्रेमींच्या नजरा असतील. तिरंदाजीत हरविंदर सिंग, राकेश कुमार ज्योती बलियान यांनीसुद्धा गेल्या काही वर्षांत सातत्यपूर्ण कामगिरी केली आहे. याव्यतिरिक्त टेबल टेनिस, तायक्वांदो, कॅनोइंग या क्रीडा प्रकारांत भारताने एकेक स्पर्धक उतरवला आहे. 1984 आणि 2016च्या ऑलिम्पिकमध्ये भारताने प्रत्येकी चार पदके कमावली. मात्र यंदा युवा आणि अनुभवी खेळाडूंचा योग्य ताळमेळ साधल्यामुळे भारत पदकांची दोन आकडी संख्या नक्कीच गाठेल, अशी आशा आहे.

Exit mobile version