नळपाईपलाईन गेली चोरीला

पोलादपूर मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार
। पोलादपूर । प्रतिनिधी ।

नगरपंचायतीच्या ताब्यातील सावंतकोंड, पार्टेकोंड प्रभाग क्रमांक 1 मध्ये नळपाणीपुरवठा करण्याची पाईपलाईन चोरीला गेल्याची तक्रार काँग्रेस शहर अध्यक्ष अमोल भुवड यांनी पोलादपूर नगरपंचायतीचे मुख्याधिकारी महादेव रोडगे यांच्याकडे दिली आहे. यापूर्वी याच ठिकाणी असलेल्या लोखंडी पुलाची चोरी झाल्यानंतर एफआयआर दाखल होताच पुलाचे तुकडे घटनास्थळी आढळून आले होते. काँग्रेस शहरअध्यक्ष अमोल भुवड यांनी त्या घटनेसंदर्भातील आरोपी अटक करण्यासाठी उपोषणाचा इशारा दिला असताना पुन्हा चोरीची घटना झाल्याने शहरामध्ये खळबळ उडाली आहे. पोलादपूर तालुक्यात भंगारमाफियांनी अनेक विकासकामे खोदून चोरल्याच्या घटना गेल्या वर्षभरात झाल्या असून त्याकडे सपशेल दूर्लक्ष केले गेले आहे.


पोलादपूर नगरपंचायतीच्या हद्दीतील प्रभाग क्रमांक 1 मध्ये दोन महिन्यांपूर्वी एक लोखंडी पुल कापून चोरून नेण्याची घटना पोलादपूर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल झाल्याने चर्चेत आली होती. मात्र, गुन्हा दाखल होऊन आरोपी पकडण्याआधीच तुकडे तुकडे केलेला लोखंडी पुल घटनास्थळी अज्ञात इसमांनी आणून ठेवल्याने याबाबत कोणताही तपास झाला नाही. या घटनेबाबत सर्वशृत आरोपींची चर्चा पोलादपूर शहरात होत असताना आता याच सावंतकोंड पार्टेकोंड परिसरातील नागरिकांना नळाद्वारे पाणीपुरवठा करण्यासाठी टाकण्यात आलेली भुमिगत पाईपलाईन चोरीस गेल्याचे सोमवारी सकाळी ग्रामस्थांना समजून आले. त्यामुळे काँग्रेसतर्फे विधानसभा युवक अध्यक्ष अ‍ॅड.सचिन गायकवाड, नगरसेवक स्वप्नील भुवड आणि काँग्रेस शहरअध्यक्ष अमोल भुवड यांनी मुख्याधिकारी महादेव रोडगे यांना याप्रकरणी पोलीस तपास होऊन कारवाई होण्याकामी एफआयआर दाखल करण्यासाठी निवेदन दिले.


पोलादपूर तालुक्यात अनेक ठिकाणी रस्त्यालगतच्या रेलिंगचे कठडे, पुलाचे कठडे, लोखंडी पूल, स्मशानाचे आयबीम लोखंडी खांब, वादळामुळे कोसळलेले विजेचे लोखंडी खांब आदी विकास कामांशी निगडीत वस्तुंची भंगार माफियांनी सर्रास चोरी करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली असून याबाबत प्रशासनाकडून फारसे गांभिर्याने बधितले जात नसल्याने सर्वशृत चोरांची उदयास आलेली जमात तालुक्यात प्रतिष्ठा प्राप्त करीत असल्याचे दिसून येत आहे.

Exit mobile version