पोलिसांचे कसब पणाला; अखेर त्या तिघांवर अंतिम संस्कार
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यातील चिकनपाडा येथील पोशीरपाडामधील तिहेरी हत्याकांडाला दीड दिवस उलटला आहे. मात्र, त्या तिहेरी हत्याकांडाच्या आरोपीपर्यंत पोलीस अद्याप पोहोचले नाहीत. दरम्यान, मुंबई येथील जे जे रुग्णालयात शवविच्छेदन करून आणलेल्या तिन्ही मृतदेहांवर बोरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
चिकनपाडा गावाच्या हद्दीतील पोशीरपाडा या भागातील मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील आणि विवेक मदन पाटील यांचा खून झाला असल्याचे रविवारी सकाळी निष्पन्न झाले होते. बोरगाव येथील मूळ रहिवासी असलेले मदन पाटील आणि त्याचा भाऊ हनुमंत पाटील हे गेली 15 वर्षे चिकनपाडा गावाच्या हद्दीतील पोशीरपाडा येथे घर बांधून राहात आहेत. रविवारी (दि. 8) रोजी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास दहा वर्षीय विवेक मदन पाटील याचा मृतदेह नेरळ कळंब रस्त्याखालून वाहणार्या नाल्यातील पाण्यात आढळून आला होता. त्यानंतर 30 वर्षीय अनिशा मदन पाटील यांचा मृतदेहदेखील त्याच नाल्यातील पाण्यात आढळून आल्यावर 35 वर्षीय मदन जैतू पाटील यांचा मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांकडे मृत महिला अनिशा यांचे भाऊ माले या गावातील रुपेश वेहले यांनी नेरळ पोलिसांकडे तक्रार केली होती. संबंधित तिन्ही मृतदेह पोलिसांनी रविवारी दुपारी कर्जत उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवले होते. या काळात संशयित तरुणांकडून तिघांच्या खुनाबद्दल कोणतीही माहिती मिळाली नाही. पोलिसी खाक्या दाखवूनदेखील संबंधित खून प्रकरणातील आरोपी जेरबंद होत नसल्याने या घातपाताचा उलगडा झाला नाही. त्यामुळे या तिहेरी खून प्रकरणाचे तपास अधिकारी पोलीस उपअधीक्षक धूळदेव टेले यांनी संबंधित तिन्ही मृतदेहाचे शवविच्छेदन मुंबई येथील जे जे रुग्णालयात करण्याचा निर्णय घेतला आणि मृतदेह मुंबई येथे पाठवून दिले.
याप्रकरणी नेरळ पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. त्या गुन्ह्यात अज्ञात व्यक्ती किंवा व्यक्तींनी मदन पाटील यांच्या घरात घुसून कोणत्यातरी अज्ञात कारणाने कोणत्यातरी अज्ञात शस्त्राने शरीरावर वार करून ठार मारून त्यांना घराच्या पाठीमागील बाजूने वाहणार्या नाल्याच्या पाण्यात टाकून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला, असा गुन्हा दाखल केला असून, घटना घडली त्या घरात श्रीगणेशाचे आगमनदेखील शनिवारी झाले आहे. जे जे रुग्णालयातून शवविच्छेदन केलेले मृतदेह यांच्यावर पोशीरपाडा येथेच अंतिम संस्कार करण्यात यावेत, अशी भूमिका माले येथील वेहले कुटुंबाने घेतली होती. तर बोरगाव येथील पाटील कुटुंबाने बोरगाव येथे अंतिम संस्कार करण्यात यावेत, अशी भूमिका घेतली होती.
सकाळी माले येथील शंभरहून अधिक लोक नेरळ कळंब रस्त्याने बोरगाव गावाकडे जाणारा बोरगाव रस्ता अडवून ठेवला होता. त्यामुळे मृतदेह घेऊन आलेल्या शववाहिन्या कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावरील भोईरवाडी गावाजवळ थांबवून ठेवल्या होत्या. शेवटी नेरळ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांनी कळंब येथे धाव घेऊन बोरगाव फाट्यावर रस्ता अडवून बसलेल्या माले गावातील ग्रामस्थांची समजूत काढली आणि शेवटी अंतिम संस्कार बोरगाव येथे करण्याचे नक्की झाले. त्यांनतर रस्त्यात थांबवून ठेवलेली शववाहिनी बोलावून घेण्यात आली. दुपारी बारा वाजता शववाहिनीमधून मृतदेह बोरगाव गावी आणण्यात आले. त्यानंतर तेथे शेकडो शोकाकुल वातावरणात मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील आणि दहा वर्षीय विवेक मदन पाटील या तिघांवर अंतिम संस्कार चिल्हार नदीवर करण्यात आले. तेथे मदन जैतू पाटील, अनिशा मदन पाटील यांना अग्नी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले, तर विवेक या मुलाचा मृतदेह जमिनीत दफन करण्यात आला.
दुःखी नातेवाईकांचा टाहो
बोरगाव येथील पाटील कुटुंबाने खून करणारे आरोपीला अटक होत नाही तोवर मृतदेह ताब्यात घेतले जाणार नाहीत आणि अंतिम संस्कार केले जाणार नाहीत अशी भूमिका सुरुवातीला घेतली होती. तर माले ग्रामस्थांनी आशा सेविका असलेल्या आपल्या बहिणीसह तिचे पती आणि भाचा यांच्यावर पोशीर पाडा येथेच अंतिम संस्कार व्हावेत, अशी भूमिका घेतली होती. मात्र, पोलिसांनी समजून काढून त्या विषयात यशस्वी मार्ग काढला.
पोलिसांचे कसब पणाला
रविवारी सकाळी घटना उघडकीस आल्यावर नेरळ पोलीस अर्ध्या तासात घटनास्थळी हजर होते. तेंव्हापासून नेरळ पोलीस तसेच कर्जत पोलीस यांचे पथक घटनेचा तपास हाती घेवुन गुन्ह्याची उकल करण्याचा प्रयत्न करीत होते. त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी अन्य कोणाचे मोबाईल फोन सुरू होते, त्या भागातील कोणती वाहने यांची ये-जा झाली, घटनेनंतर कळंब किंवा नेरळ रस्त्याने किंवा कळंब पाषाने रस्त्याने कोणी पळून जाण्यात यशस्वी ठरले आहे काय? याचा शोध 24 तास केल्यावरदेखील मुख्य सूत्रधार आणि आरोपीपर्यंत नेरळ पोलीस पोहचले नाहीत. त्यामुळे नेरळ पोलिसांच्या कार्यक्षमतवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.