नगरपरिषद प्रशासनाचे दुर्लक्ष
| श्रीवर्धन | प्रतिनिधी |
श्रीवर्धन येथील मठाच्या स्मशानभूमीमध्ये नागरिकांसाठी बसण्यासाठी तयार केलेली निवारा शेड गेल्या अनेक दिवसांपासून पूर्णपणे मोडून गेली आहे. त्यावरील छप्पर तुटून पडून गेले आहे. याबाबत अनेक वेळा नगरपरिषद प्रशासनाकडे तक्रारी देखील करून झाल्या. परंतु, नगरपरिषद प्रशासनाकडून सदर निवारा शेडची दुरुस्ती करण्यासाठी कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात येत नाही.
मठाची स्मशानभूमी या ठिकाणी श्रीवर्धन नगरपालिकेसह आराठी ग्रामपंचायत हद्दीतील मेटकर्णी, आराठी परिसरात कोणाचेही मयत झालास त्यांचा अंत्यविधी करण्यासाठी मयत मठाच्या स्मशानभूमीमध्ये आणले जाते. तसेच, गावातील देखील सर्वात जास्त अंत्यविधी याच स्मशानभूमी मध्ये केले जातात. त्या ठिकाणी तीन लाकडाने जाळण्याच्या शवदाहिन्या असून नगरपालिकेने कोट्यावधी रुपये खर्च करून गॅस शवदाहीनी देखील बांधली आहे. परंतु, शहरातील नागरिकांकडून केवळ अंधश्रद्धेपोटी गॅस शवदाहीनीचा वापर होताना दिसत नाही. लाकडाने अंत्यविधी करण्याच्या शवदाहिन्यांचे लोखंडी पोल पूर्णपणे वाकून गेले आहेत. त्याचीही दुरावस्था झालेली आहे. त्याचप्रमाणे या ठिकाणी मयतावर येणाऱ्या जेष्ठ नागरिकांना किंवा वृद्ध लोकांना उन्हात किंवा पावसात उभे राहावे लागते. याकडे अनेक वेळा लक्ष वेधून सुद्धा नगरपरिषद प्रशासन पूर्णपणे जाणीवपुर्वक दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. आता तर नगरपालिकेची निवडणूक झाली आहे. सत्तेमध्ये नवीन लोकप्रतिनिधी देखील बसले आहेत. त्यांनी देखील सदर निवारा शेडचे काम तातडीने पूर्णत्वाकडे जाईल याकडे लक्ष देण्याची आवश्यकता आहे. जर निवडून गेलेले लोकप्रतिनिधी अशा दुर्लक्षित गोष्टींकडे लक्ष देत नसतील. तर श्रीवर्धन नगर परिषदेची निवडणूक घेण्याला अर्थच काय? अशी चर्चा नागरिकांमध्ये होत असल्याचे पाहायला मिळते.







