| मुंबई | वृत्तसंस्था |
भारतात 2011 मध्ये झालेल्या क्रिकेट विश्वचषक स्पर्धेत टीम इंडियाने अजिंक्यपद पटकावले. कॅप्टन कूल महेंद्र सिंह धोनीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने विश्वचषक जिंकला. या विश्वचषकात भारतीय गोलंदाजी अतिशय प्रभावी ठरली होती. त्यात फिरकीपटूंनी मोलाची कामगिरी बजावली होती. मात्र, यंदाच्या विश्वचषक स्पर्धेत भारतीय फिरकी गोलंदाची यशस्वी ठरेल का, असे प्रश्न निर्माण होऊ लागले आहेत. फिरकीत वैविध्य नसल्याचा फटका बसू शकतो, अशी भीती चाहते व्यक्त करत आहेत.
आताच्या संघाचा विचार करता भारतीय फिरकी गोलंदाजी कमकुवत असल्याचे दिसतेय. भारताने कुलदीप यादव हा एकमेव फिरकी स्पेशालिस्ट घेतलाय. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल त्यांच्या जोडीला आहेत. पण हे दोन्ही गोलंदाज एकाच धाटणीचे आहेत. 2011 च्या विश्वचषकात भारताकडे अश्विन, हरभजन, पियुष चावला आणि युवराज सिंह असे विविधता असणारे फिरकी गोलंदाज होते. प्रत्येक गोलंदाजाची शैली आणि ताकद वेगळी होती. पण सध्या भारताकडे फिरकीचे फक्त तीन पर्याय असल्याचे दिसतेय. आघाडीचा कोणताही फलंदाज गोलंदाजी करत नाही. त्यामुळे भारतीय संघाकडे मर्यादा असल्याचे स्पष्ट होतेय. याचाच फायदा प्रतिस्पर्धी संघ घेऊ शकतात. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि पाकिस्तान संघात भरभरुन डावखुरे फलंदाज आहेत. डावखुऱ्या फलंदाजाविरोधात ऑफ स्पिन गोलंदाजी प्रभावी ठरते, हे काही नव्याने सांगायची गरज नाही. असे असतानाही टीम इंडियात एकाही ऑफ स्पिनरला स्थान देण्यात आलेलं नाही. इतकेच काय टीम इंडियात लेग स्पिनरही घेतला नाही. रविंद्र जाडेजा आणि अक्षर पटेल मधल्या षटकात डावखुऱ्या फलंदाजाविरोधात किती प्रभावी गोलंदाजी करु शकतील, याबाबत शंकाच आहे. या दोघांपैकी एकालाही मार पडला तर गोलंदाजीचे गणित बिघडू शकते.