| रोहा | प्रतिनिधी |
राज्याच्या किंवा जिल्ह्याच्या उन्नतीसाठी दर्जेदार रस्त्यांचे जाळे असणे आवश्यक आहे. मागील अनेक वर्षांपासून चर्चेत असलेला प्रमुख राज्य मार्ग उसरोली-रोहा-कोलाड या रस्त्याचे काम वेगाने पूर्णत्वास जात आहे. सुमारे 106 कोटी रुपये या रस्त्याच्या कामासाठी खर्च होणार आहेत. पण, रस्ता रुंदीकरण व डांबरीकरण झाल्यानंतर लगेचच रस्त्याच्या बाजूला अतिक्रमणे होत असल्याचे निदर्शनास येत आहे.
या रस्त्याचे काम ठेकेदाराकडून वेगाने केले जात असून, कामाचा दर्जादेखील समाधानकारक असल्याची प्रतिक्रिया जनतेमधून व्यक्त होत आहे. पण, जसजसे रस्त्याचे काम पूर्ण होत आहे. रस्त्याच्या बाजूला वेगाने अतिक्रमणे होत असल्याचे चित्रदेखील दिसत आहे. रोहा शहरात सिमेंटचा रस्ता बनविण्यात येत आहे. पण, या रस्त्यावर फेरीवाले, रिक्षा यांचे अतिक्रमण होत असल्याचे दिसून येत असल्याने हा रस्ता वाहनांसाठी का फेरीवाले आणि रिक्षा पार्किंगसाठी, असा प्रश्न निर्माण झाला आहे.
शहरात प्रवेश करत असताना फिरोज टॉकीजच्या समोरील भागात काही अवजड वाहने व दुचाकी रस्त्याच्या कडेला कायमस्वरूपी लावून ठेवलेली असल्याने रस्ता मोठा होऊन देखील वाहतूक कोंडी कायम आहे. शहरात भाजीपाला आणि फळविक्रेते यांना व्यवसायासाठी नगरपालिकेने जागा दिली आहे. पण अनेकजण मुख्य रस्त्यावर आपले व्यवसाय करत असल्याने रस्ता मोठा होऊनदेखील शहरातील वाहतूक कोंडी कायम आहे. शहरात चणेरा बाजूने प्रवेश करताना दर्ग्याच्या जवळ काही डंपर रस्त्यावरच कायमस्वरूपी उभे असल्याचे दिसून येत आहे. यामुळे उसरोली ते कोलाड हा प्रमुख राज्य मार्ग सुसाट होणार असला तरी अतिक्रमणे आणि बेजबाबदार पार्किंग यामुळे वाहनांच्या गतीला ब्रेक लागत आहे. प्रमुख राज्य मार्गाच्या लगत होत असलेली अतिक्रमणे आणि बेजबाबदार पार्किंग व फेरीवाले यांना आळा घालण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग, पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन यांनी संयुक्त मोहिम राबविणे गरजेचे असल्याचे दिसून येत आहे.
अधिकृत रिक्षा तळ किती?
रोहा शहरातील रिक्षा तळांवर किती गाड्या एका वेळेस उभ्या करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. याबाबत उल्लेख असलेला फलक कुठेही दिसून येत नाही. रोहा बसस्थानक परिसरात प्रीमियर टेलर समोर, जैन मंदिराच्या शेजारी, डबीर कॉम्प्लेक्सजवळ, नगरपालिका कॉर्नर, मोठ्या पाण्याच्या टाकीसमोर, रायकर पार्क, दमखाडी नाका, फिरोज टॉकीज परिसर या ठिकाणी मुख्य रस्त्यालगत तीन व सहा आसनी रिक्षांचे वाहनतळ आहेत. यापैकी किती अधिकृत हा मुद्दा बाजूला ठेवला तरी एका वाहनतळावर एका वेळी किती रिक्षा उभ्या असाव्यात याबाबत पोलीस प्रशासनाने काहीतरी निर्णय घेण्याची आवश्यकता दिसून येत आहे.