। नेरळ । प्रतिनिधी ।
नेरळ पोलीस ठाणे अंतर्गत झालेले अपघात तसेच विविध गुन्ह्यांखाली जप्त करण्यात आलेल्या वाहनांचा ढीग पोलीस ठाणे परिसरात पडला आहे. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या मान्यतेने त्या बेवारस आणि भंगार वाहनांचा लिलाव होणार आहे. दरम्यान, येत्या 4 मार्च रोजी ही प्रक्रिया पूर्ण केली जाणार असून इच्छुकांनी लिलाव प्रक्रियेत सहभाग नोंदवावा, अशी माहिती प्रभारी पोलीस अधिकारी शिवाजी ढवळे यांनी दिली आहे.
नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील गुन्ह्यात आणि अपघातात जमा करण्यात आलेली वाहने धूळखात पडून आहेत. त्यामधील 5 दुचाकी आणि 2 चारचाकी वाहनांची नोंद रायगड जिल्हा पोलिसांच्या अभिलेखावर आहे. या वाहनाच्या मालकांचा शोध घेण्यात आला; परंतु, आजपर्यंत या वाहनाच्या मालकांबाबत कोणतीही उपयुक्त माहीती प्राप्त झालेली नाही. तसेच, भविष्यातसुद्धा या वाहनांचे मालक मिळुन येतील अशी शक्यता नाही. त्यामुळे या 7 बेवारस वाहनांचे पनवेलचे प्रादेशिक परीवहन अधिकारी यांनी मुल्यांकन केलेले असून त्याची रक्कम 62 हजार इतकी करण्यात आलेली आहे.
अधिकृत परावानाधारकांनाच संधी
या भंगार वाहनांचा लिलाव दि.4 मार्च रोजी सकाळी अकरा वाजता नेरळ पोलीस आवारात आयोजीत करण्यात आलेला आहे. या लिलाव प्रकियेमध्ये सहभाग नोंदविणार्या ईच्छुकांनी त्यांच्याकडे असणार्या भंगारमाल खरेदीविक्री करण्याच्या परवान्याची प्रत आणि तात्पुरत्या स्वरुपात अनामत रक्कम 10 हजार रुपये दि.3 मार्च रोजी सकाळी अकरा वाजेपर्यंत नेरळ पोलीस ठाण्यात जमा करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान, भंगार माल खरेदी विक्री करण्याचा अधिकृत परवाना आणि मुदतीमध्ये अनामत रक्कम भरणार्यांनाच लिलाव प्रकियेमध्ये सहभाग नोंदविता येईल याची नोंद घ्यावी, असेदेखील आवाहन करण्यात आले आहे.