पाच हजार लोकांपर्यंत यात्रा पोहोचणार
| रोहा | प्रतिनिधी |
सेवाभावी भावनेने लोकोपयोगी कार्य राबविणार्या जनकल्याण समितीतर्फे जिल्ह्यात सेवारथ यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या सेवारथ यात्रेला रोह्यातून प्रारंभ झाला असून, जिल्ह्यातील पाच हजार लोकांपर्यंत ही यात्रा पोहोचविण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे.
गेली पन्नास वर्षे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या माध्यमातून शिक्षण, आरोग्य, संस्कार, कृषी, पर्यावरण, स्वावलंबन, पूर्वांचल विकास, आपत्ती विमोचन आदी विषयांमध्ये समर्पित कार्य सुरू असून, समितीचे हे सुवर्णमहोत्सवी वर्ष असल्याने विविध सेवाभावी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आह. त्यानिमित्त दि. 20 ते 27 डिसें. या कालावधीमध्ये सेवा रथयात्रेचे आयोजन करण्यात आले असून, याचा प्रारंभ मंगळवारी रोह्याच्या श्रीराम मारुती चौकातून करण्यात आला.
जनकल्याण समितीचे काम जनमानसात सर्वदूर पोचावे हा या सेवारथाचा प्रमुख उद्देश असून या माध्यमातून रोहा, पाली, नागोठणे, माणगाव, पोलादपूर, महाड, म्हसळा, श्रीवर्धन, तळा, मुरुड आदी ठिकाणी पाच हजार लोकांपर्यंत संपर्क करण्याचा मानस असल्याचे आयोजकांतर्फे सांगण्यात आले. माजी नगरसेविका अपर्णा पिंपळे यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. जनकल्याण समिती रायगडचे अध्यक्ष जयेश छेडा यांनी यावेळी या सेवारथाचे उद्देश उपस्थितांना सांगितले.
सौ. अपर्णा पिंपळे यांनीही आपले विचार व्यक्त केले. यावेळी समितीचे कोकण विभागाचे कार्यवाह अविनाश धाट, निधी प्रमुख गिरीश पेंडसे, जनकल्याण समिती रायगड जिल्हा अध्यक्ष जयेश छेडा, कार्यवाह पुरुषोत्तम कुंटे, निधी प्रमुख ऍड. धनंजय धारप, कोषाध्यक्ष श्रीपाद गिरधर, सह कार्यवाह सौ. अरुंधती पेंडसे, शिक्षण -संस्कार आयाम रायगड विभाग प्रमुख सौ. आरती पेंडसे, सह कोषाध्यक्ष विष्णु जोशी, जनकल्याण समिती रोहा प्रमुख श्रीनिवास साठे सर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ रोहा तालुका कार्यवाह संजीव कवितके, भाजपा रोहे शहर अध्यक्ष यज्ञश भांड, उत्तम भांड, मकरंद गोविलकर, अनंत साने आदींसह रोहेकर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.