अभियानातून होणार त्रुटींची पूर्तता

xr:d:DAFT9h13XAo:3,j:12896316,t:22120606

रायगड जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा उपक्रम

| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |

रायगड जिल्ह्यामध्ये सेवा संकल्प अभियान राबविण्यात येणार आहे. या अभियानाच्या माध्यमातून मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र तातडीने देण्यासाठी महिनाभर विशेष मोहीम असणार आहे. या मोहिमेची सुरुवात गुरुवारी (दि.17) पासून सुरु केली आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात त्रुटींची पूर्तता 17 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी सहभागी होऊन त्रुटींची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन उपायुक्त तथा समितीचे सदस्य जयंत चाचरकर यांनी केले आहे.

राज्यामध्ये 17 सप्टेंबर ते 17 ऑक्टोबर या कालावधीत सेवा संकल्प अभियान सुरु करण्यात आले आहे. या अभियानातून जिल्ह्यामध्ये वेगवेगळे उपक्रम राबविले जाणार आहेत. सेवा कार्याचा लाभ सामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त हे अभियान हाती घेण्यात आले आहे. रायगड जिल्ह्यात जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या मार्फतही अभियान राबविले जाणार आहे. अकरावीतील (विज्ञान शाखा) प्रवेशित आणि, बारावीमध्ये शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या 2026-2027 मधील प्रवेशित सर्व मागासवर्गीय विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र मिळण्यासाठी विशेष मोहीम असणार आहे. अनुसुचित जाती, एसईबीसी, इमाव तसेच इतर प्रवर्गातील विद्यार्थ्यांची प्रलंबित प्रकरणे त्वरित निकाली काढण्यात येणार आहेत. जात वैधता प्रमाणपत्रासाठी देण्यात आलेल्या कागदपत्रांची पडताळणी व त्रुटींची पूर्तता सकाळी दहा ते सायंकाळी सहा यावेळेत 17 ऑक्टोबरपर्यंत होणार आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना तातडीने जात वैधता प्रमाणपत्र देण्याचा प्रयत्न जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडून असणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी या कार्यालयात येऊन त्रुटीची पूर्तता करून घ्यावी, असे आवाहन जयंत चाचरकर यांनी केले आहे.

Exit mobile version