| नवी मुंबई | प्रतिनिधी |
नवी मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या मोरबे धरणात केवळ 43 टक्के पाणीसाठा शिल्लक असून, 103 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा उपलब्ध असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंद यांनी दिली आहे. संभाव्य एल निनो वादळाच्या शक्यतेमुळे यंदा सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पाणीटंचाईची शक्यता लक्षात घेता नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी केले. महासभेत शुक्रवारी (दि. 24) मोरबे धरणाच्या पाणीसाठ्याबद्दल आयुक्त शिंदे यांनी माहिती दिली. महापालिका क्षेत्राला मोरबे आणि बारवी धरणांतून पाणीपुरवठा केला जातो.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, यंदा पर्जन्यमान सरासरीच्या 92 ते 94 टक्क्यांपर्यंत राहण्याची शक्यता आहे. 2007 ते 2025 या कालावधीत मोरबे परिसरात सरासरी 3617 मिमी पावसाची नोंद झाली आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी साधारण 3500 ते 3600 मिमी पावसाची आवश्यकता असते. मात्र, यंदा सुमारे 3300 मिमी पावसाचा अंदाज असल्याने धरण पूर्ण क्षमतेने भरण्याबाबत अनिश्चितता निर्माण झाली असल्याचे आयुक्तांनी सांगितले. सध्या पाणी कपातीचा निर्णय घेतलेला नसला, तरी परिस्थितीचा आढावा घेऊन भविष्यात त्याबाबत निर्णय घेतला जाईल, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
103 दिवस पुरेल इतकाच साठा
मोरबे धरणाची एकूण साठवण क्षमता 190.890 दशलक्ष घनमीटर असून सध्या 82.557 दशलक्ष घनमीटर म्हणजेच सुमारे 43 टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. यापैकी एक महिन्याचा राखीव साठा वगळल्यानंतर प्रत्यक्ष वापरासाठी सुमारे 27 टक्के पाणी उपलब्ध आहे. सध्याच्या वापराच्या दरानुसार हा साठा 7 ऑगस्ट 2026 पर्यंत, म्हणजेच सुमारे 103 दिवस पुरेल, अशी माहिती आयुक्तांनी दिली.
पाणी कपातीचा निर्णय लवकरच ?
पाणी कपातीचा निर्णय तूर्तास तरी घेण्यात आला नसला तरी येत्या 10-15 दिवसांत पर्जन्यमान आणि एकूण परिस्थतीचा आढावा घेऊन त्यासंदर्भात निर्णय घेतला जाईल असे आयुक्त डॉ. केलीस शिंदे यांनी स्पष्ट केले आहे. पुढील वर्षीही पाणीपुरवठा सुरळीत राहावा, यासाठी आतापासूनच नियोजन करण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.
नागरिकांना प्रशासनाच्या सूचना
नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचा अपव्यय टाळावा, वाहन धुण्यासाठी पाणी वापरणे टाळावे, पाणी साठवण टाक्या ओसंडून वाहणार नाहीत याची दक्षता घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.
