सहा दिवसांत नभांगणात होणार अंतराळ केंद्राचे दर्शन

| अकोला | वृत्तसंस्था |

अंतराळ अभ्यास व संशोधनासाठी जगातील 16 देशांनी एकत्र येऊन एक महाकाय अंतराळ केंद्र (स्पेस स्टेशन) उभारले आहे. दि.11 ते 16 मे या सहा दिवसांच्या कालावधीत पहाटे व रात्री या अंतराळ केंद्राचे दर्शन होणार आहे. हे अंतराळ केंद्र दरताशी सुमारे 26 हजार किलोमीटर या वेगाने साधारण 400 किलोमिटर अंतरावरून पृथ्वी भोवती फिरत असल्याने ते जेव्हा आपल्या भागात येते तेव्हा ते आपण नुसत्या डोळ्यांनी पाहून आनंद घेऊ शकतो. या दरम्यान सहा वेळा पहाटे व सहा वेळा रात्री असे बारा वेळा दर्शन घेता येईल.

दि.11 मे रोजी रात्री 7:13 ते 7:16 या वेळी दक्षिण आकाशात पूर्वेकडे जाताना दिसेल. ही प्रकाशणारी फिरती चांदणी पाहील्यानंतर पुन्हा रात्री 8:48 ते 8:51 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. दि.12 मेच्या पहाटे 5:02 ते 5:07 पर्यंत उत्तरेकडील आकाशात पूर्वेकडे फिरत जाताना दिसेल. याच दिवशी रात्री 7:59 ते 8:06 यावेळी अधिक प्रमाणात प्रकाशताना आकाशात बघता येईल. दि.13 मे रोजी पहाटे 4:13 ते 4:18 या वेळी उत्तर पूर्व बाजूला आणि रात्री 7:11 ते 7:17 या वेळी आकाशात अधिक चांगल्या प्रतीची चांदणी बघायला मिळेल. पुन्हा दि.14 मे रोजी पहाटे 5:01 ते 5:08 या वेळात आकाशात अपूर्व अनुभूती घेता येईल. पुन्हा याच दिवशी रात्री 8 ते 8:04 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस पाहता येईल. दि.15 मे रोजी पहाटे 4:13 ते 4:19 या वेळी उत्तरेकडून पूर्वेकडे आणि रात्री 7:11 ते 7:16 या वेळी पश्चिमेकडून उत्तर बाजूस बघता येईल. दि.16 मे रोजी पहाटे 3:29 ते 3:30 या वेळी पूर्व आकाशात अगदी कमी वेळ तर पुन्हा पहाटे 5:02 ते 5:06 यावेळी पश्चिम आकाशात दक्षिणेकडे जाताना बघता येईल. असा हा सहा दिवसांचा अनोखा आकाश नजारा आकाश प्रेमींनी पहावा, असे आवाहन ज्येष्ठ खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी केले आहे.

Exit mobile version