| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत-कल्याण राज्यमार्गवर आज सकाळी सात वाजता महाविद्यालयात जात असलेल्या तीन विद्यार्थ्यांना कारने उडवल्याची घटना घडली आहे. या अपघातात एक विद्यार्थी गाडीच्या चाकाखाली आल्यामुळे गंभीर जखमी झाला होता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. नेरळ पोलिसांनी गाडी चालकास अटक केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नेरळमधील जुम्मा पट्टी भागातील टेकडीवर असलेल्या धसवाडी येथील विद्यार्थी कर्जत-कल्याण रस्त्याने चालत नेरळ विद्या मंदिर तसेच कनिष्ठ महाविद्यालय येथे जात होते. मात्र, नेरळ गावातील पोलीस ठाणेपासून विद्या मंदिर शाळेपर्यंत असलेला रस्ता अरुंद आहे. त्यामुळे या भागात असलेला रस्ता दुपदरी करावा अशी अनेक वर्षाची मागणी आहे. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास याच रस्त्याने भगवान सखाराम पारधी, विशाल आलू दरवडा हे दोघे बारावीचे आणि मयूर मोहन पारधी हा अकरावीत शिकणारा असे तिघे विद्यार्थी कॉलेजमध्ये जाण्यासाठी निघाले होते. तिघे रस्त्याच्या डाव्या बाजूने चालत असताना त्यांच्या मागाहून येणाऱ्या कारने धडक दिली. या धडकेत मयूर पारधी हा विद्यार्थी गाडीच्या चाकाखाली आला. तर दुसरे दोन विद्यार्थी हे गाडीचे बोनेटवरून गाडीच्या काचेवर जावून आदळले. या अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना कार चालक लोचन दिलीप धुरी याने स्थानिकांच्या मदतीने रुग्णालयात नेले. मात्र जखमी विद्यार्थ्यांना झालेल्या जखमा पाहून तत्काळ बदलापुर रुग्णालयात नेण्यास सांगण्यात आले. बदलापूर येथील खासगी रुग्णालयात भगवान सखाराम पारधी आणि विशाल आलू दरवडा या दोघांवर उपचार सुरू आहेत. गाडीच्या चाकाखाली गेलेला मयूर पारधी यास डोंबिवली येथील एम्स रुग्णालयात पाठवून देण्यात होते. मात्र उपचार घेत असताना मयूरचा मृत्यू झाला आहे. पोलिसांनी अपघातास कारणीभूत असलेला गाडीचा चालक लोचन धुरी यास अपघातग्रस्त गाडीसह अटक केली आहे. या घटनेचा अधिक तपास नेरळ पोलीस करीत आहेत.