उसाचा रस, दही, ताकाला मागणी; रसवंतीगृह, शीतपेयाच्या स्टॉलवरही गर्दी
। अलिबाग । वार्ताहर ।
दिवसभर उन्हाची काहिली व उकाड्याचे वाढते प्रमाण यामुळे उन्हाचे चटके मोठ्या प्रमाणत जाणवत आहेत. ऊन, प्रचंड उकाडा, घशाला सतत पडणारी कोरड यामुळे शहरात जागोजागी थंडपेयाची मागणी वाढली आहे. त्यामुळे नागरिक आता शीतपेयाच्या स्टॉलकडे वळू लागले आहेत. परिणामी, स्टॉलधारकांनी शीतपेय विक्रीवर विशेष भर दिल्याचे दिसून येत आहे.

उन्हाची तीव्रता वाढत असल्यामुळे नागरिक हैराण होत आहेत. त्यामुळे विविध ठिकाणी थंडपेयाची दुकाने थाटली असल्याचे चित्र दिसून येत आहे. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाचा रस, लिंबू पाणी, कोकम सरबत, शहाळ्याच्या पाण्याला अधिक पसंती दिली आहे. सर्व स्टॉलवर ही पेय हमखास मिळत आहेत. कामानिमित्त येणारे बहुतांश नागरिक काही मोक्याच्या ठिकाणी असलेल्या स्टॉलवर मोसंबी, डाळिंब, संत्री आदी फळांचा ज्यूस पिण्यासाठी गर्दी करीत असल्याचे दिसत आहे. तर बच्चेकंपनी कालाखट्टा, कच्ची कैरी, मिल्क शेक तसेच बर्फाचा गोळा खाण्याचा आनंद घेत असल्याचे चित्र शहरांमध्ये दिसत आहे.
रसवंतीवर गर्दी
शहरात ठिकठिकाणी सरवंतीची दुकाने सुरू आहेत. उन्हापासून दिलासा मिळण्यासाठी नागरिकांनी उसाच्या रसाला पसंती दिली आहे. अलिबाग शहर आणि परिसरात रसवंतीची दुकाने थाटली आहेत. या रसवंतीगृहावर प्रवाशांची गर्दी होत आहे.
सण-उत्सवात ताक, मठ्ठा
सध्या धार्मिक कार्यक्रम, विवाह सोहळे व इतर कार्यक्रमांसाठी बाहेरगावी जाणार्यांची उसाच्या रसाला पसंती दिली असल्याचे दिसून येत आहे. तापमानामुळे विवाह समारंभ, सण-उत्सावात ताक, मठ्ठा भोजनातील अविभाज्य घटक झाला आहे. दही, तूप, ताक, लोणी आदींची विक्री वाढली आहे.
बर्फाला मागणी वाढली
उन्हाच्या झळांपासून थोडासा गारवा मिळावा म्हणून नागरिकांची पावले रसवंतीगृह, शीतपेयांच्या स्टॉलवर वळत आहेत. त्यामुळे बर्फाच्या मागणीत वाढ झाली असल्याचे विक्रेत्यांकडून सांगण्यात आले. सण-उत्सव आणि लग्नसोहळ्यांमुळेही बर्फाला मागणी वाढल्याचे दिसून येत आहे.