| उरण | वार्ताहर |
उरणसारख्या औद्योगिक पट्ट्यात गॅस टँकर पलटी होणं म्हणजे थेट मृत्यूच्या जबड्यात फेकलं जाणं. करळ ब्रिजवर सोमवारी 19 मे रोजी गॅस भरलेला टँकर पलटी झाला आणि आकाशभर धुरांचे लोट उठले. क्षणात गॅस हवेत मिसळला आणि परिसरात दहशतीचं मळभ पसरलं. या टँकरमधून नायट्रोजन असल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात, पण तोपर्यंत स्थानिकांची भंबेरी उडाली होती. समोरून वाहन आलं असतं तर काय हाहाकार झाला असता, याचा विचार करूनच अंगावर काटा येतो.
या ब्रिजवरचं वळण ‘अपघातप्रवण’ असूनही प्रशासन गाफीलच आहे. अवजड वाहनांचं मनमानी पार्किंग, अनधिकृत गोडाऊनं, आणि बेधुंद चालकांची मुजोरी हेच या दुर्घटनांचं मूळ कारण आहे.उरणकर जनता संतप्त झाली आहे. आज नायट्रोजन, उद्या ज्वलनशील गॅस असता तर? कोण घेतं त्याची जबाबदारी? असा थेट सवाल नागरिकांनी केला आहे. प्रशासनाच्या गलथान कारभारावर आता थेट बोट ठेवलं जातंय. आज उरण हादरलंय, आता तरी कारवाई झालीच पाहिजे, अशी सर्वसामान्य जनतेची मागणी आहे.