त्रिपुरारी पौर्णिमानिमित्त डोलकाठीचा थरार

| कर्जत | प्रतिनिधी |

कर्जत तालुक्यातील किरवली, हालीवली, वांजळे आदी गावांमध्ये त्रिपुरारी पौर्णिमा यात्रा स्वरूपात साजरी करण्यात येते. यंदा किरवली येथील ग्रामदैवत श्री भैरवनाथाची यात्रा उत्साहात पार पडली. किरवली-देऊळवाडी येथे देवाची डोलकाठी नाचविली जाते. यंदा सुद्धा तरुण ग्रामस्थांनी ही डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर, हातावर ठेऊन नाचविली. हा थरार पहाण्यासाठी भाविकांनी गर्दी केली जाते. नवसाला पावणाऱ्या या दैवताचे दर्शन कर्जत शहरातील भाविकांबरोबरच परिसरातील भाविकांनीही मोठ्या संख्येने घेतले.

देऊळवाडी-किरवली येथील श्री भैरवनाथ मंदिराच्या परिसरात नवसाला पावणाऱ्या व परिसराचे रक्षण करणाऱ्या श्री भैरवनाथाची यात्रा पहाटे साडेचार वाजता काकड आरतीने सुरु झाली. त्यानंतर परिसरातील श्रीपती बाबा प्रासादिक भजन मंडळाचे संगीत भजन झाले. परंपरेनुसार या डोलकाठीच्या टोकाला ढाक येथील चढण्या-उतरण्यास अत्यंत कठीण असलेल्या ढाक-भैरी मंदिरातून ट्रस्टचे सचिव दिलीप बडेकर यांच्या नेतृत्वाखाली आणलेला गरुड ध्वज आणला आणि काठीच्या तुऱ्यावर बांधला. या डोलकाठीची पुजारी प्रकाशबुवा बडेकर यांच्या हस्ते करण्यात आली. त्यानंतर डोलकाठीचा मोर पिसाऱ्याने शिवमंदिरातील शिवपिंडीला आरतीच्या वेळी वारा घालून ही तीस फुट उंचीची वजनी डोलकाठी हनुवटीवर, दातांवर, कपाळावर व हातावर ठेऊन संकेत बडेकर, दीपक आंग्रे, सौरभ बडेकर, वैभव थोरवे, सुयोग गायकर, ओमकार बडेकर, दीपक आंग्रे, निखिल पन्हाळे, विनीत शेलार, पप्पू पाटील, विनायक बडेकर, प्रसाद बडेकर आदींनी नाचवित नेली. ही वजनी डोलकाठी नाचविण्यासाठी ताकदीची गरज नसते तर अनुभवाची आवश्यकता असते.

डोलकाठी नाचवीत देऊळवाडी, पुलाचीवाडी, बोरवाडी, किरवली येथे नेण्यात आली. त्या पाठोपाठ श्री भैरवनाथाची पालखी सावळाराम बडेकर,आणि अंकुशबुवा बडेकर, किशोर बडेकर, वासुदेव बडेकर, विजय पन्हाळे, भरत थोरवे, निखिल पन्हाळे, गजानन बडेकर यांनी उचलली. प्रत्येक घरी पालखीत असलेल्या अश्वारूढ श्री भैरवनाथाच्या मूर्तीची मनोभावी आरती व पूजा करण्यात आली. दिवेलागणीच्या सुमारास सुवासिनींनी उकडलेल्या पिठाचे दिवे सुपातून उडविले. पूर्वी हे दिवे घेण्यासाठी एकच झुंबड असे. ते खाण्यात वेगळीच मजा येत होती परंतु कालानुरूप त्यात बदल झाला असून हल्ली उडविलेले दिवे उचलण्यासाठी मुले येत नाहीत. दर्शन घेण्यासाठी व नवस फेडण्यासाठी भाविकांची गर्दी होती. पुत्रप्राप्तीसाठी केलेला नवस बालकांचा गुळाची तुला करून करण्यात येत होता. नवजात बालकांना सुधा श्री भैरवनाथाच्या पायाशी ठेऊन दर्शन घेण्यासाठी सुद्धा गर्दी होती. एकंदरीत त्रिपुरारी पौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी बबन बडेकर, ज्ञानेश्वर तुरडे, भास्कर बडेकर, नारायण बडेकर, दिलीप बडेकर, यश महाराज बडेकर, नथुराम साळोखे, हनुमंत गायकर, बिपीन बडेकर, रत्नाकर बडेकर सागर बडेकर वैभव थोरवे, प्रकाश बडेकर, प्रभाकर बडेकर, जीवन बडेकर, रामचंद्र बडेकर, चंद्रकांत थोरवे, जयवंत बडेकर, कैलास बडेकर, शत्रुघ्न बडेकर, महेश शेलार, अरविंद बडेकर, प्रकाश पप्पू आदी उपस्थित होते.

Exit mobile version