थरार…शिस्त, संयम आणि विश्वास

। अलिबाग । प्रतिनिधी ।

गोविंदा रे गोपाळा… या गाण्यांच्या सुरावर ठेका घेत रायगड जिल्ह्यात अनेक भागांमध्ये दहीहंडी सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. काही ठिकाणी सकाळी तर काही ठिकाणी दुपारी दहीहंडी फोडण्याच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. सायंकाळी पाचपर्यंत हा सोहळा पार पडला. मात्र अलिबागमधील शेकाप पुरस्कृत मानाच्या दहीहंडीचा व इतर तालुक्यातील उत्सव रात्री उशीरापर्यंत सुरुच राहणार आहे. दुपारपासून सुरु झालेल्या दहीहंडी सोहळ्याचा आनंद गोविंदा पथकांसह उपस्थितांनी व प्रेक्षकांनी मनमुरादपणे लुटला. त्यामध्ये अलिबागमधील मानाच्या दहीहंडीचा सोहळा अतिशय रंगतदार ठरणार आहे.

1 / 6

दुपारी दोन वाजल्यापासून शेतकरी भवन समोर नागरिकांनी जमण्यास सुरुवात केली. कधी ऊन तर कधी पाऊस असतानादेखील गेल्या अनेक वर्षाची परंपरा पाहण्यासाठी बोलता बोलता गर्दी वाढू लागली. डिजेचा ठेका, सुमधूर अशी गाणी, विजेचा झगमगाट, शिस्तबध्द नियोजन, फुलांनी सजविलेली दहीहंडी, तरुणाईच्या सन्मानाचा तसेच गोविंदा पथकासह उपस्थितांच्या सुरक्षेचा विचार करून अलिबागमध्ये दहीहंडी उभारण्यात आली. उंचावर बांधण्यात आलेली दहीहंडी फुलांनी आणि विद्युत रोषणाईने आकर्षक अशी सजविली होती. त्यामुळे अनेकांनी ही दहीहंडी आपल्या मोबाईलच्या कॅमेरात कैद करण्याचा प्रयत्न केला.

काहींनी व्हीडीओ तर काहीं दहीहंडी समवेत सेल्फीचाही आनंद लुटला. ढोल ताशांच्या गजरातून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडवून या सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान विधानसभेचे माजी विरोधी पक्ष नेते अ‍ॅड. दत्ता पाटील, शेकापच्या नेत्या, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील यांना उपस्थितांनी श्रध्दांजली अर्पण केली. त्यानंतर अलिबाग अर्बन बँकेच्या अध्यक्षा सुप्रिया पाटील यांच्या हस्ते नारळ वाढवून मानाच्या दहीहंडी सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, शेकाप राज्य महिला आघाडी प्रमुख अ‍ॅड. मानसी म्हात्रे, रायगड जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील, रायगड बाजाराचे चेअरमन नृपाल पाटील, प्रदिप नाईक, माजी आ. पंडित पाटील, भावना पाटील, आस्वाद पाटील, चित्रा पाटील, जनता शिक्षण मंडळाचे अध्यक्ष अ‍ॅड. गौतम पाटील, सतिश प्रधान, नागेश कुलकर्णी, आदी मान्यवरांसह माजी नगरसेवक, प्रशांत नाईक मित्र मंडळाचे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.

सहा थरांची सलामी पेझारी येथील साई प्रेरणा महिला गोविंदा पथकामार्फत दहीहंडी सलामीला सायंकाळी चारनंतर सुरुवात झाली. या सोहळ्यामध्ये एकूण 53 गोविंदा पथकाने सहभाग घेतला. त्यात 29 पुरुष गोविंदा पथक व 24 महिला गोविंदा पथकाचा समावेश आहे. विघ्नहर्ता महिला गोविंदा पथक पेझारी, आंबेपूर, श्रीकृष्ण गोविंदा पथक वेश्‍वी, श्री काळभैरेश्‍वर महिला गोविंदा पथक पवेळे, विठ्ठल रखूमाई गोविंदा पथक कुंठ्याची गोठी अशा अनेक महिला गोविंदा पथकाने यशस्वी सलामी नोंदविली. तसेच पुरुष गटातील श्री काळभैरेश्‍वर गोविंदा पथकानेदेखील सहा थरांची यशस्वी सलामी दिली.


जिल्ह्यात आठ हजार हंड्या फोडल्या
जिल्ह्यामध्ये एकूण आठ हजारहून अधिक दहीहंड्या फोडण्यात आल्या. दरम्यान काही ठिकाणी सांस्कृतिक तर काही ठिकाणी बाल्या नृत्यांचे सादरीकरण करीत पारंपारिक नृत्याचे दर्शन घडवून आले. त्यानंतर प्रत्येकाने साखळी करीत संपुर्ण गावात शहरातील गल्लीत जाऊन दहीहंडी फोडण्याचा कार्यक्रम जल्लोषात साजरा केला. या उत्सवात महिलादेखील सहभागी झाल्या होत्या. लहान मुलांबरोबरच तरुणाईंनीसुध्दा या उत्सवाचा आनंद घेतला. यावेळी 17 पोलीस अधिकारी, 64 पोलीस कर्मचारी, 17 अंमलदार व 19 होमगार्ड कडेकोट पहारा ठेवण्यात आला होता.
पत्रकातून महिला सुरक्षेची मागणी
महिलांवर होणार्‍या अत्याचार व हत्येचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहे. या घटनांचे अलिबागमध्येदेखील तीव्र निषेध व्यक्त केले जात आहे. दहीहंडी उत्सवानिमित्त मी अलिबागकर महिला गोविंदा पथकाने पत्रक तयार करून त्याद्वारे महिला सुरक्षेचा संदेश पोहचविण्याचा प्रयत्न केला. लाडक्या बहिणींना पैशाची नाही, तर सुरक्षेची गरज अशी मागणी या पत्रकाद्वारे करण्यात आली.
डिजेच्या ठेक्यावर अनेकजण थिरकले
आला रे आला गोविंदा आला… अशा अनेक गोविंदाच्या गाण्यांचा आनंद डिजेवर घेण्यात आला. दहीहंडी सोहळ्याच्या निमित्ताने डीजे साऊंडची व्यवस्था करण्यात आली होती. यावेळी अनेकजण डिजेच्या ठेक्यावर नाचत असल्याचे चित्र दिसून आले.
घरबसल्या दहीहंडीचा आनंद
अलिबागमधील शेतकरी भवन समोर शेकाप पुरोगामी युवक संघटना अलिबाग पुरस्कृत व प्रशांत नाईक मित्रमंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले. दरवर्षीप्रमाणे होणार्‍या या सोहळ्यातील गर्दीमध्ये काहींना प्रत्यक्षात हा सोहळा पाहता येत नाही. त्यामुळे घरबसल्यादेखील दहीहंडी उत्सव बघण्याची व्यवस्था करण्यात आली होती. अलिबागसह वेगवेगळ्या भागातील लाखो नागरिकांनी प्रोलिंक स्पोर्ट्स या लिंकवर मानाच्या दहीहंडीचा कार्यक्रम पाहिला. काहींनी स्थानिक केबलवरही दहीहंडीची स्पर्धा अनुभवली.
दहीहंडी उत्सवात लाखोंची उलाढाल
रायगड जिल्ह्यामध्ये अलिबाग, पाली, माथेरान, दादर, खोपोली, मुरूड, महाड, नागोठणे, रोहा, कर्जत, नेरळ, पेण, श्रीवर्धन, माणगांव, पनवेल, उरण अशा अनेक ठिकाणी राजकिय पक्ष, सामाजिक संस्था, मित्र मंडळ, फाऊंडेशनच्या माध्यमातून 10 हजारापासून सात लाखापर्यंत बक्षीसे गोविंदा पथकासाठी ठेवण्यात आली. सुमारे 40 लाखाहून अधिक रुपयांची उलाढाल बक्षीसांवर झाली असून सलामी देणार्‍या पथकांवरही लाखो रुपये खर्च करण्यात आले आहे. यातून गोविंदा पथकांना आर्थिक बळ देऊन पारंपारिक खेळाला एक व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
शेकापच्या दहीहंडीची परंपरा कायम
शेतकरी कामगार पक्ष पुरोगामी युवक संघटना अलिबाग व प्रशांत नाईक मित्र मंडळ आयोजित दहीहंडी उत्सवाची परंपरा सुमारे वीस वर्षापासून सुरु आहे. ही परंपरा आजही मोठ्या जल्लोषात जपली जात आहे. गोविंदा पथकांना यातून एक हक्काचे व्यासपिठ मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आज जिल्ह्यात वेगवेगळ्या राजकिय पक्षातील मंडळी हा उत्सव तालुका स्तरावर साजरा करीत असल्याचे चित्र आहे.
मुंबईत 41 गोविंदा जखमी; 7 जणांना डिस्चार्ज

मुंबईसह ठाण्यात पावसाची रिपरिप सुरूच आहे. पावसामुळे गोविंदाचा उत्साहदेखील शिगेला पोहोचला आहे. सकाळपासून मुंबईतील गोविंदा पथक वेगवेगळ्या दहीहंडी फोडत आहे. दहीहंडी फोडताना 41 गोविंदा जखमी झाले आहेत. या गोविदांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये 8 गोविंदाना रुग्णालयात दाखल केलं आहे. 26 गोविंदांवर ओपीडीमध्ये उपचार सुरु आहेत तर 7 गोविंदांना उपचार करुन डिस्चार्ज देण्यात आला आहे.
Exit mobile version