मॅकविलाच्या टीमची थरारक कामगिरी
एका महिला गिर्यारोहकाचा समावेश
सुधागड-पाली | गौसखान पठाण |
सुधागड तालुक्यातील धोंडेस गावापासून काही अंतरावर व सुधागड किल्ल्याच्या समोर आणि मुळशी तालुक्यात 230 फूट उंचीचा तैलबैला हा सुळका आहे. वर्षांअखेर या अवघड सुळक्याच्या चारही बाजूंवर मॅकविला द जंगल यार्ड च्या टीम ने दोन दिवस थरारक यशस्वी चढाई केली आहे. यामध्ये या मोहिमेत मॅकमोहन हुले, सागर मेस्त्री, आयुष सिंग व शोभा मोहपात्रा हे प्रस्तरारोहक सहभागी झाले होते.
सुधागड तालुक्यातील पोटलज खुर्द गावचे सुपूत्र व मॅकविला द जंगल यार्ड चे संस्थापक मॅकमोहन हुले यांनी रविवारी (दि. 2) माहिती देताना सांगितले की या सुळक्याचा 90 अंशांतील कातळकडा आणि अंतिम टप्प्यातील अवघड चढाईमुळे गिर्यारोहकांचा पूर्णपणे कस लागला.
तैलबैला हा किल्लेवजा सुळका असून तो प्रस्तरारोनासाठी अतिशय कठीण श्रेणीमध्ये ओळखला जातो. या नैसर्गिक भिंतीवर चारही बाजूंनी आरोहण करता येते. अनुभवी प्रस्तरारोहक मॅकमोहन यांच्या नेतृत्वाखाली ही मोहीम फत्ते करण्यात आली. अनुभवी गिर्यारोहक आपल्या तंत्रशुद्ध अभ्यासासहित तेलबैला सरावासाठी मोहिमा आखतात असे देखील मॅकमोहन यांनी सांगितले.
थंडीच्या दिवशी सुळक्याच्या भोवती खूप सोसाट्याचा वारा असतो. थंडीमुळे अंगावरील कपडे हे संपूर्ण शरीर झाकेल असे उबदार असावेत. पाठीवरील बॅग मध्ये दोन लिटर पाणी व पौष्टीक आहार असावेत. प्रस्तरारोहण करतांना ऊर्जा मिळते.
मॅकमोहन हुले, प्रस्तरारोहक
पहिली प्रस्तरारोहण चढाई
सागर मेस्त्री या अनुभवी गिर्यारोहकाने प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. ते 80 फुटावरील पहिल्या स्टेशनला पोहोचले. त्यांना सुरक्षा दोर आयुष सिंग यांनी दिले. सागर यांच्यापाठोपाठ आयुष सिंग हे सुद्धा पहिला स्टेशनला पोचले. मॅकमोहन हे सर्व दोर सोडवत पहिल्या स्टेशनवर पोहोचले. आयुष सिंग यांना पुढचा टप्पा अवघड जाणार म्हणून त्यांनी रॅपलडाऊन केले. पुढील चढाई मॅकमोहन यांनी लीड केली व दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात पोहोचले. मागोमाग सागर मेस्त्री यांनी झूमररिंग करत अंतिम टप्प्यात माथा गाठला.
दुसरी प्रस्तरारोहण चढाई
गिर्यारोहक आयुष सिंग यांनी लीड क्लायम्बिंग करून पहिले स्टेशन गाठले, त्यांना सुरक्षा दोर मॅकमोहन यांनी दिले. शोभा यांनी त्यांच्या मागोमाग चढाई केली. अशाप्रकारे दुसरे स्टेशन तसेच तिसरे स्टेशन करत अंतिम टप्प्यात माथा गाठला.
तिसरी प्रस्तरारोहण चढाई
सुधागड किल्ल्याकडे बाजू अवघड असून, ही तिसर्या श्रेणीत गणली जाते. सर्वप्रथम चढाई करण्यासाठी मॅकमोहन यानी तयारी केली. त्यांना सागर मेस्त्री यांनी सुरक्षा दोर दिला. प्रथम 50 फुटांचा कातळकडा चढून मॅकमोहन प्रस्तराच्या कंगोर्यावर पोहचले. त्यापाठोपाठ झुमरिंग करत सागर मेस्त्री तेथे दाखल झाले. पुढील 90 अंशातील कातळकडा चढताना मॅकमोहन यांचा कस लागला. तिरक्या रेषेत चढाई करत त्यानी 80 फुटांवर दुसरा टप्पा घेतला. त्यानंतर पुढील 30 फूट आणि 50 फुटांवर मॅकमोहन पोचला. 50 फुटांची अंतिम चढाई पूर्णपणे दगड, मातीमिश्रित ठिसूळ संरचनेची (स्क्री) आहे. त्यामुळे या मार्गात अत्यंत सावध राहत आणि दगड ढासळणार नाहीत याची काळजी घेत मॅकमोहन सुळक्याच्या माथ्यावर पोचले. त्याच्यापाठोपाठ सागर मेस्त्री हे गिर्यारोहक माथ्यावर दाखल झाले.
चौथी प्रस्तरारोहण चढाई
तेलबैलाच्या मध्यस्थानी मंदिराकडील उजव्या बाजूची प्रस्तरारोहण चढाई ही दुसर्या श्रेणीत गणली जाते. मॅकमोहन यांनी प्रथम प्रस्तरारोहण चढाईला सुरुवात केली. त्यांना सुरक्षा दोर सागर मेस्त्री यांनी दिले. अंतिम टप्प्यापर्यंत दोघांनी सुरक्षित आरोहण केले.