। कर्जत । प्रतिनिधी ।
तुपगांव बौद्धवाडीत विकास कामांसाठी आमदार निधीतून 70 लाखाचा निधी मंजूर झाला आहे. यामध्ये 60 लाखाचा निधी सभागृहासाठी आणि 10 लाखाचा निधी रस्त्याकरिता मंजूर करण्यात आला आहे. दरम्यान, 10 लाखाच्या निधीचा रस्ताच चोरीला गेल्याची अजब घटना तुपगांव याठिकाणी घडली आहे. तेथील ग्रामपंचायत सदस्य निलेश मोरे यांच्या सतर्कतेमुळे आणि पत्रव्यहारामुळे ही बाब उघडकीस आली आहे. दरम्यान, वंचित बहुजन आघाडी आणि तुपगांव ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने सोमवारी (दि.24) राजिप कर्जत उपविभाग उपअभियंता (बांधकाम) यांच्या दालनात भेट घेऊन आक्रमक पवित्रा घेतला. त्यांनी झालेल्या प्रकाराचा निषेध व्यक्त करीत दोन दिवसांत सर्व माहिती मिळाली नाही आणि दोषींवर कायदेशीर कार्यवाही केली नाही तर येणार्या काळात वरिष्ठ पातळीवर पत्रव्यवहार करू. तसेच, आपणाला देखील फौजदारी गुन्ह्यात आरोपी करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला आहे.