| पाताळगंगा | वार्ताहर |
ग्रामीण भागात तालुक्याच्या ठिकाणी मेंढपाळांचे दरवर्षी मोठ्या प्रमाणात आगमन जरी होत असले, तरीसुद्धा चार्याच्या अभावाने मोठ्या प्रमाणात भटकंती करावी लागत आहे. ही वस्तुस्थिती सध्या तालुक्याच्या ठिकाणी निर्माण झाली आहे.
पूर्वी कोकणात मोठ्या प्रमाणात चारा असायचा. मात्र, गेल्या काही वर्षांत औद्योगिकरणाचे जाळे मोठ्या प्रमाणात पसरल्याने शिवाय जंगले नामशेष होत असल्यामुळे त्याचबरोबर पावसाला संपताच वणवे मोठ्या प्रमाणात लागले जात असल्यामुळे या सर्व कारणावरुन मेंढ्यावर उपासमारीचे संकट निर्माण झाले आहे. त्याचबरोबर पिण्याच्या पाण्याची समस्या मोठ्या तीव्रतेने जाणवत आहे.
पूर्वी माळरान आणि डोंगराच्या परिसरात काटेरी वनस्पती मोठ्या प्रमाणात असायची. हेच अन्न म्हणून शेळ्या, मेंढ्या भक्षण करीत असत. यामुळे दूध उत्पादनात वाढ होत होती. मात्र, चार्याच्या अभावाने आम्ही आर्थिक संकटात सापडत आहोत, असे मेंढपाळांनी सांगितले.
पावसाळा संपताच घाटमाथ्यावरील मेंढपाळ आपल्याजवळ असलेला लवाजमा घेऊन कोकणात येत असतात. जागा मिळेल तिथे मुक्काम आणि सकाळी पुढे प्रवासाला जाणे, असा नित्यक्रम मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत चालत असतो, पावसाळा सुरू होताच आम्ही मंडळी गावी पोहोचतो, असे मत घाटमाथ्यावरुन आलेल्या मेंढपाळांनी सांगितले.