बजाज हारक्युलेस व्हाईस्ट कंपनीचा पुढाकार
। खोपोली । प्रतिनिधी ।
खालापूर तालुक्यातील धामणी गाव आणि डोंगराळ भागात आदिवासीवाडी अनेक कुटुंब वास्तव्य करीत असून या ठिकाणी पाणी पुरवठा कमी प्रमाणात होत असल्याने येथील सामजिक कार्यकर्ते संतोष चिले यांनी धामणी गावाजवळ असणार्या बजाज हारक्युलेस व्हाईस्ट कंपनीच्या ट्रस्ट मार्फत सामजिक दायित्व फंडातून निधी उपलब्ध करून गावातील व आदिवासी वाडीतील पाणी प्रश्न सोडविला आहे. त्यामुळे संतोष चिले यांच्या पाठपुराव्याला यश आल्याने या कामाचे भूमिपूजन करून शुभारंभ करण्यात आला.
याप्रसंगी हारक्युलेस व्हाईस्ट कारखान्याकडून वरिष्ठ व्यवस्थापन अधिकारी अमित भल्ला, विजय सिंग, कर्जत खालापूरचे विधानसभा अध्यक्ष संतोष बैलमारे, सहकारी व्यवस्थापन अधिकारी किरण मुकादम, निलेश खैरनार, मंगेश तोंडे, प्रसन्न कदम, सतिष डुकरे, निलेश तळकर, किरण बैलमारे, रोटरी क्लबचे अध्यक्ष माजी अनिल खालापूरकर, सुरेश खेडकर, सुरेंद्र जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.
या पाणी योजनेच्या प्रकल्पासाठी जवळपास 30 लाख निधी उपलब्ध करण्यात आला असून 85 हजार लिटर पाणी साठवण करणारी टाकी बांधण्यात येणार आहे अशी माहिती व्यवस्थापनाच्या वतीने देण्यात आली. यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शशिकांत फणसे यांनी तर आभार संतोष चिले यांनी मानले.