सात तासांच्या अथक प्रयत्नांना आले यश
| माथेरान | प्रतिनिधी |
माथेरानला लागून असलेल्या पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी गेलेल्या महिलेचा पाय घसरून खोल दरीत पडल्याची घटना शनिवारी घडली. शिवमंदिरात असणाऱ्या पुजाऱ्याने तिच्या बचावाचा आवाज ऐकल्याने तिला दरीतून सुखरूप वर काढण्यात शोध पथकाला यश आले. विशेष म्हणजे दैव बलवत्तर म्हणून खोल दरीत पडूनही हि गिर्यारोहक महिला सुदैवाने बचावली. जखमी झालेल्या महिलेला नेरळ ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून सोडून देण्यात आले आहे.
शनिवारी आणि रविवारी पेब किल्ल्यावर गिर्यारोहणासाठी गिर्यारोहक दाखल होतात. शनिवारी सकाळी एका पथकासोबत गिर्यारोहक महिला पेब किल्ल्यावर गिर्यारोहणाची आली होती. पेब किल्ला ट्रेकिंग करून चढत असताना त्या महिलेचा पाय घसरला आणि ती खोल दरीत कोसळली. दरीत कोसळल्यानंतर घाबरून न जाता त्या महिलेने आपल्या बचावासाठी हाक मारण्यास सुरुवात केली. दरीतून तिचा वाचवा , वाचवा असा बचावाचा आक्रोश असणारा आवाज पेब किल्ल्यावरील शिव मंदिरातील पुजाऱ्याने ऐकला. त्याने तातडीने याबाबतची माहिती माथेरान पोलिसांना दिली.
यावेळी माथेरान पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक शेखर लव्हे यांनी सह्याद्री शोध पथकाला संपर्क केला. सह्याद्री शोध पथक दुपारी एक वाजण्याच्या सुमारास पेब किल्ल्यावर पोहोचले. त्यानंतर त्यांनी दरीत जेथे महिला पडली होती त्या ठिकाणी धाव घेतली. सह्याद्री शोध पथक आणि पोलिस यांनी महिलेचा आवाज येत असलेल्या ठिकाणी पोहचले. खोल दरीत अडकून पडलेल्या महिलेला धीर देत रॅपलिंगचे दोर दरीत सोडून अतिशय कठीण जागेतून महिलेपर्यंत पोहचले. तिला धीर दिल्यानंतर दोरीला बांधून खोल दरीतून सुखरूप बाहेर काढले. सायंकाळी सहाच्या दरम्यान महिलेला मुख्य मार्गावर आणण्यात यश आले. दरीत पडल्याने महिलेला थोड्या जखमा झाल्या होत्या . ती जखमी असल्याने तिला नेरळ प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. उपचार केल्यानंतर त्या महिलेला घरी सोडून देण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.
सह्याद्री शोध पथकात वैभव नाईक, सुनील कोळी, चेतन कळंबे, संदीप कोळी, महेश काळे, अक्षय परब, सुनील ढोले यांचा समावेश होता. माथेरान पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक गणेश गिरी, पोलीस नाईक घनश्याम पालवे, पोलिस शिपाई प्रशांत गायकवाड, दामोदर खतेले, वन विभागाचे कर्मचारी तसेच आदीवासी बांधव सुद्धा शोध पथकाच्या मदतीला होते.