| म्हसळा | प्रतिनिधी |
भारतीय स्वातंत्र्यपूर्व काळात समाजातील पूर्वजांनी गवळी समाजाची संघटना उभी करून मुंबईतील दादर-नायगाव येथे महाराष्ट्र यादव चॅरिटी ट्रस्टची भव्य वास्तू उभारली ही समाजासाठी अभिमानाची बाब आहे. समाज स्तरावर वंचित मानला जाणारा यादव समाज संख्या कमी असला तरी आज इतर समाज घटकांना दिशा देणारा समाज म्हणून पुढे येत असल्याचे प्रतिपादन अजय बिरवाटकर यांनी केले.
महाराष्ट्रीय यादव चॅरिटी ट्रस्ट, म्हसळा शाखेचा 28 वा वर्धापन दिन सोहळा, हळदी-कुंकू समारंभ तसेच शिष्यवृत्ती व पारितोषिक वितरण कार्यक्रम घोणसे निवाचीवाडी येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ट्रस्टचे शिखर समिती अध्यक्ष अजय बिरवाटकर हे उपस्थित होते. ट्रस्टने समाज हिताच्या विविध योजना प्रभावीपणे राबवून त्याचा योग्य विनियोग केल्यामुळे दोन वेळा राज्यपालांच्या हस्ते सन्मान प्राप्त झाल्याची माहिती त्यांनी दिली. पुढे सांगताना समाजाच्या प्रगतीसाठी तब्बल 53 कोटी रुपये खर्चून सात मजली नवीन इमारत उभारण्याची संकल्पना मांडण्यात आली असून ती पूर्णत्वास नेण्यासाठी सर्व समाजबांधवांचे सहकार्य अपेक्षित असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
समाजातील अनिष्ट चालीरीती,अवाजवी खर्चिक कार्यक्रम यांना आळा घालण्याची गरज व्यक्त करताना माता-भगिनींचा सन्मान राखणे ही समाजाची जबाबदारी असल्याचेही त्यांनी नमूद केले. यावेळी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात श्रीकृष्ण पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.






