प्रशासनाच्या नाकाखाली नशेचा बाजार
| उरण | प्रतिनिधी |
उरण शहर आणि तालुक्यात फुलचंद नावाच्या पानाची क्रेझ वाढली असून, या पानांमुळे तरुण पिढी गांजासारख्या नशेच्या आहारी जात असल्याचा संशय आहे. गावोगावच्या पानटपऱ्यांवर खुलेआम विक्री होत असून, यामध्ये अंमली पदार्थांची भेसळ असल्याचे अनेकांचे म्हणणे आहे.
फुलचंद, पंचरत्न, नवरत्न, 120-300, बनारस आणि कलकत्ता या नावांनी नशायुक्त पान विकले जात असून, एक पान 30 ते 35 रुपयांना विकले जाते. यातून मिळणारी झिंग गांजासारखी असून, अल्पवयीन विद्यार्थीही याच्या आहारी जात आहेत. काही ठिकाणी या पानांवर मैफिली आणि पैजादेखील लावल्या जात आहेत.
शहरातील, जेएनपीटी, द्रोणागिरी, कंटेनर यार्ड व ढाब्यांवर ही पानं सर्रासपणे मिळत असून, सुगंधित तंबाखू, सुपारीसह अज्ञात नशेचा पदार्थ त्यात मिसळला जातो. परिणामी, अनेक तरुणांचे आरोग्य धोक्यात येत आहे. कर्करोग व इतर गंभीर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. यावर कारवाई करण्याऐवजी अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस विभाग मात्र निव्वळ बघ्याची भूमिका घेत आहेत. अनेक वेळा बातम्यांद्वारे ही बाब उचलून धरली गेली तरी, कारवाईच्या नावाखाली केवळ दिखावेगिरी होत आहे. गुटखा, सिगारेटसारख्या पदार्थांवर बंदी असताना, गांजासदृश नशा देणाऱ्या पानांची विक्री रोखण्यात प्रशासन अपयशी ठरत आहे. तरुण पिढीचे भवितव्य धोक्यात येत असताना, संबंधित प्रशासनाने जागे होऊन तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.







