नेरळच्या आठवडा बाजारात चोरी

। नेरळ । वार्ताहर ।
गणेश उत्सव जवळ येत असल्याने नेरळ मधील बुधवारच्या आठवडा बाजारात मोठ्या प्रमाणात गर्दी होत असून या गर्दीचा फायदा चोरांनी घेतला आहे. बुधवारच्या आठवडा बाजारात चोर्‍यांचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. तर अनेकांनी बँकेतून काढलेले पैसे चोरी होण्याच्या घटना देखील वाढल्या आहेत. बेकरे येथील जेष्ठ नागरिक चंद्रकांत हाबळे यांच्या खिशातील 10 हजार रुपये तर नेरळ मधील एका महिलेच्या हातातील पर्स आणि त्यामधील मोबाईल आणि 1 हजार रुपये लंपास केले.
हाबळे यांनी नेरळमधील युनियन बँक मधून सेवा निवृत्तीचे वेतन 10 हजार रुपये काढले त्यानंतर ते बाजारात खरेदी करत होते. त्यावेळी एका हार्डवेअर च्या दुकानातून त्यांच्या खिशातील 10 हजार रुपये चोरट्याने पळवून नेल्याची घटना बुधवारी सकाळी साडेअकरा च्या सुमारास घडली. तर नेरळ मधील एका महिलेचा हातातील पर्स त्यामधील मोबाईल, 1 हजार रुपये आणि घराच्या चाव्या असलेली पर्स लंपास केली आहे.

Exit mobile version