| नेरळ | प्रतिनिधी |
माथेरान या पर्यटनस्थळी नेरळ येथून जलवाहिनीमधून पाणी जाते. दरम्यान, उल्हास नदी ते माथेरान या जलवाहिनीवरून पाण्याची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे. त्या नळजोडण्या तात्काळ तोडण्यात याव्यात, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटे यांच्यासह स्थानिक करू लागले आहेत. माथेरानमध्ये दररोज 16 तास पाण्याचा उपसा होऊनदेखील पाणी कमी पोहचत आहे. त्यामुळे पाणी चोरीवर रोख लावण्याची मागणी पुढे येत आहे.
कुंभे येथे उल्हास नदीमधून पाणी उचलले जाते. त्यानंतर ते पाणी अशुद्ध पाण्याच्या जलवाहिनीमधून जुम्मापट्टी येथून वॉटर पाईप आणि पुढे माथेरान असे जाते. त्यासाठी तीन ठिकाणी पंप हाऊस बांधण्यात आले असून, त्यांच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा सुरळीत करण्याचा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या प्रयत्न असतो. त्यामुळे अशुद्ध पाण्याच्या जलवाहिनीमधून कोणालाही पाणी वाटप करता येत नाही. परंतु, उल्हास नदी ते माथेरान या मार्गात काही नळजोडण्या देण्यात आल्या असल्याचे समोर आले आहे. माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटे यांच्या तक्रारीनुसार, महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने काही नळजोडण्या या मुख्य जलवाहिनीवरून देण्यात आल्या आहेत. त्या जलवाहिनीमधून बेकायदेशीररित्या पाणी उचलले जात असून, त्यावर माथेरानमधून आता आवाज उठवला जात आहे. त्याचवेळी हे अनधिकृत नळजोडणी देणाऱ्या जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे.
माथेरानमधील शारलोट लेक आणि नेरळ येथून माथेरानकरिता दर दिवशी पाणी उपसा होत आहे. मात्र, हा पाणी उपसा किती होतो, त्याची कोणतीही नोंद माथेरानमधील जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडे नाही. तसेच कुंभे, जुम्मापट्टी आणि वॉटर पाईप येथील पंप हाऊसमध्ये वीजेचा वापर किती होतो, त्याची देखील कुठेही नोंद नाही, असा आरोप पार्टे यांनी केला आहे. माथेरान शहरात सर्व ठिकाणी कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. ते योग्य दाबाने आणि सुरळीत व्हावा, याकरिता कोणत्याही उपाययोजना जीवन प्राधिकरणकडून करण्यात येत नाही. त्याचवेळी जीवन प्राधिकरण ही योजना राबवत असताना माथेरानमध्ये पर्यटन हंगाम असताना देखील या शहरात जीवन प्राधिकरणाचे शाखा अभियंता हे आठ-आठ दिवस माथेरानकडे फिरकत नाहीत. त्यामुळे या सर्व प्रकाराची चौकशी राज्य सरकारने करावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते जनार्दन पाटे यांनी केली आहे.
माथेरानकडे जाणाऱ्या पाण्याची चोरी
