स्वराज्य संस्थांसाठी 22 जानेवारीला सर्वोच्च सुनावणी; ग्रामीण कारभारावर शेकापचे वर्चस्व
| आविष्कार देसाई | रायगड |
लोकसभा आणि विधानसभा निवडणुका पार पडल्या आहेत. आता स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे वेध लागले आहेत. मात्र, सध्या सर्वोच्च न्यायालयात याबाबतचे प्रकरण गेल्या चार वर्षांपासून प्रलंबित आहे. आधीच्या राजकीय परिस्थितीनुसार स्वराज्य संस्थांच्या कारभारावर शेकापचे वर्चस्व असल्याचे दिसते. सध्या राज्यातील राजकीय परिस्थिती बदलेली आहे. त्यामुळे युत्या-आघाड्या, कोण कोणाच्या गळ्यात गळे घालणार की एकला चलो रेचा नारा देणार, हे 22 जानेवारीच्या निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. त्यामुळे आगामी कालावधीत राजकीय वातावरण ढवळून निघणार आहे.
राज्यातील 29 महागनरपालिका, 257 नगरपालिका, 26 जिल्हा परिषद आणि 289 पंचायत समित्यांच्या निवडणुका प्रलंबित आहेत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकडे सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचे लक्ष आहे. महापालिकेसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांतील सदस्यांच्या संख्येची निश्चिती, प्रभाग रचना, सदस्य संख्या निवडणूक आयोगाने निश्चित करायची की राज्य सरकारने, ओबीसी आरक्षण या मुद्द्यावर सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रकरणे सुरू आहेत. 22 तारीख असली तरी त्याआधीदेखील प्रकरण बोर्डवर घेऊन सुनावणीची विनंती करण्यात आली तर कदाचित सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लवकरात लवकर येऊ शकेल आणि त्यानंतर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांचे भवितव्य निश्चित होईल, अशी आशा आहे.
लोकसभेसह विधानसभा निवडणुकाही संपल्या असून, स्थिर सरकार सत्तेत आले आहे. त्यामुळे महायुती सरकार लवकरात लवकर या निवडणुका घेईल, अशी अपेक्षा आहे. महायुतीला स्पष्ट बहुमत दिल्यामुळे सध्या चांगले वातावरण असल्याने याचा राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न महायुती सरकार सोडेल असे दिसत नाही.
रायगड जिल्हा परिषद पक्षीय बलाबल
शेकाप-23
शिवसेना-18
राष्ट्रवादी काँग्रेस-12
काँग्रेस-03
भाजपा-03
नगराध्यक्ष
काँग्रेस -2
शिवसेना-3
राष्ट्रवादी काँग्रेस-3
उरण-1
शेकाप-1
नगराध्यक्ष- ब्रेकअप
1) अलिबाग नगर परिषद- शेकाप
2) पेण नगर परिषद -काँग्रेस
3) कर्जत नगर परिषद -शिवसेना
4) माथेरान नगर परिषद -शिवसेना
5) रोहे नगर परिषद - राष्ट्रवादी काँग्रेस
6) खोपोली नगर परिषद - राष्ट्रवादी काँग्रेस
7) महाड नगर परिषद -काँग्रेस
8) मुरुड नगर परिषद -शिवसेना
9) उरण नगर परिषद -भाजपा
10) श्रीवर्धन नगर परिषद -राष्ट्रवादी काँग्रेस
11) पनवेल महानगर पालिका- भाजपा
रायगड पंचायत समित्यांवर शेकापचाच प्रभाव
1) अलिबाग पंचायत समिती-शेकाप
2) पेण पंचायत समिती-शेकाप
3) पनवेल पंचायत समिती-शेकाप
4) उरण पंचायत समिती- शेकाप
5) कर्जत पंचायत समिती-शिवसेना
6) खालापूर पंचायत समिती- राष्ट्रवादी काँग्रेस
7) रोहे पंचायत समिती- राष्ट्रवादी काँग्रेस
8) मुरुड पंचायत समिती-शेकाप
9) तळा पंचायत समिती-राष्ट्रवादी काँग्रेस
10) पाली-सुधागड पंचायत समिती-राष्ट्रवादी काँग्रेस-शेकाप आघाडी
11) म्हसळा पंचायत समिती- राष्ट्रवादी काँग्रेस
12) माणगाव पंचायत समिती- शिवसेना
13) महाड पंचायत समिती- शिवसेना
14) पोलादपूर पंचायत समिती-काँग्रेस-शेकाप आघाडी
15) श्रीवर्धन पंचायत समिती- शिवसेना