रहिवाशांमध्ये घबराटीचे वातावरण
| पनवेल | प्रतिनिधी |
पनवेल महानगरपालिका हद्दीत येणार्या खारघरमध्ये ठिकठिकाणी मध्यरात्रीत घरफोडीचे किस्से समोर येत आहेत. त्यामुळे चोरट्यांनी खारघर पोलिसांसमोर आव्हान निर्माण केलं आहे. खारघर परिसरात गेल्या काही दिवसांमध्ये सेक्टर 12, सेक्टर 10 अशा ठिकाणी बंद घराची कुलूप तोडून चोरी झाल्याची बातमी ताजी असतानाच आणखी एक चोरांचा थरारमय सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे.
खारघर पोलीस स्टेशनच्या हद्दीत काही दिवसापासूनच चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. काल रात्री दोन ते तीनच्या दरम्यान पेठगाव येथे पुन्हा एकदा घरफोडी करत चोरट्यांनी बंद घरांना आपल्या निशाण्यावर ठेवले आहे. चोरट्यांचा हा थरार सीसीटीव्हीत कैद झाला असल्याचे दिसत आहे. अमोल पाटील यांच्या इमारतीतील एका भाडेकरूच्या बंद घराचे कुलूप तोडून आठ ते नऊ हजार चोरी झाली असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. अजय शेळके यांची बंद घराचे कुलूप तोडले असून, झंकार ब्रास बँड ऑफिसचे कुलूप तोडले असल्याचे समोर आले आहे. चार ते पाच जणांच्या चोरांच्या टोळीमुळे नागरिक हवालदिल झाले आहेत. या चोरांचा बंदोबस्त करावा आणि त्यांना अटक करावी, अशी मागणी येथील रहिवासी करत आहेत.