शरद पवारांच्या नेतृत्वाखाली तिसरी आघाडी सक्रीय?


मोदींविरोधात मोर्चेबांधणी
आज 15 विरोधी पक्षांची बैठक
नवी दिल्ली | वृत्तसंस्था |
देशात विरोधी पक्षांची तिसरी आघाडी बळकट करण्यासाठी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुढाकार घेतला आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवारी नवी दिल्ली येथे देशातील प्रमुख विरोधी 15 पक्षांच्या नेत्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. राष्ट्र मंच या बॅनरखाली ही बैठक होणर आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील भाजपचा विजयरथ रोखण्यासाठी विरोधी पक्षांना एकत्र करण्याचे प्रयत्न गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत. मात्र, काँग्रेसच्या नेतृत्वात एकत्र येण्यास अनेक प्रादेशिक पक्ष अनुकूल नाहीत. आता हे प्रादेशिक पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वात येण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. देशाला तिसर्‍या आघाडीची गरज असल्याचं म्हणत तसे संकेतही मिळत आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व्हेसर्वा शरद पवार यांनी 2024 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर विरोधकांची मोट बांधणे सुरू केले आहे. शरद पवारांनी सोमवारी निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आणि त्यानंतर मंगळवारी दुपारी चार वाजता ‘राष्ट्र मंच’ची बैठक बोलावली आहे. शरद पवारांच्या निवासस्थानी ही बैठक होईल. मोदी सरकारच्या विरोधात 2018 मध्ये यशवंत सिन्हा यांनी राष्ट्र मंचची सुरुवात केली होती.

कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच सर्व विरोधी पक्षांचे नेते प्रत्यक्षात बैठकीत सहभागी होणार आहेत. राष्ट्र मंच अंतर्गत होणार्‍या बैठकीत 15 विरोधी पक्षांचे नेते सामील होतील. बैठकीत यशवंत सिन्हा, आम आदमी पार्टीचे संजय सिंह, पवन वर्मांसह अनेक नेते सहभागी होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. शरद पवार पहिल्यांदाच राष्ट्र मंचच्या बैठकीत सहभाग घेणार आहेत. सध्या हा मंच राजकीय नाही; पण भविष्यात यातून तिसरी आघाडी तयार होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

2014 पासूनच विरोधी पक्षांना एकत्र आणण्याचे प्रयत्न सुरू आहे. गैरभाजपा आणि गैरकाँग्रेसी पक्षांना एकत्र आणण्याचा हा प्रयत्न होता. अनेक प्रादेशिक पक्षांना नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेसकडे नको आहे. कारण अनेक राज्यांत प्रादेशिक पक्षांचा थेट काँग्रेसशी सामना आहे. त्यामुळे नव्या आघाडीचं नेतृत्व काँग्रेस वगळता इतर पक्षाकडं असावं असं या पक्षांचं मत आहे.

यापूर्वी, शरद पवारांनी 15 दिवसांत दुसर्‍यांदा निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांची भेट घेतली आहे. 11 जूनला प्रशांत किशोर यांनी शरद पवार यांच्या मुंबईतील घरी भेट घेतली होती. दोघांमध्ये अर्धा तास चर्चा झाली होती. त्या भेटीकडे 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पाहिले जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात शरद पवार सर्व विरोधकांना एकत्र आणत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

Exit mobile version