सुधागडमध्ये 22 लाख 83 हजारांची दंडवसुली
| सुधागड-पाली | प्रतिनिधी |
सुधागड तालुक्यात बेकायदेशीर माती उत्खननाच्या घटना वाढत असून, शासनाच्या रॉयल्टीशिवाय मोठ्या प्रमाणात उत्खनन सुरू असल्याचे प्रकरण कृषीवलने लावून धरले होते. त्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. तालुक्यातील 13 अनधिकृत उत्खनन प्रकरणे उघडकीस आली असून, त्यावर 22 लाख 83 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.
वारंवार प्रसिद्ध होणार्या वृत्तानंतरही ठोस कारवाई झाली नसल्याने पर्यावरणप्रेमी आणि नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात होती. ही परिस्थिती लक्षात घेत तहसीलदार उत्तम कुंभार यांनी सर्व मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना सखोल चौकशीचे आदेश दिले. या चौकशीत सुधागड तालुक्यात 13 अनधिकृत उत्खनन प्रकरणे उघडकीस आली आणि दंडात्मक कारवाई म्हणून 22 लाख 83 हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. या कारवाईमुळे नागरिकांमध्ये सकारात्मक प्रतिसाद दिसून आला असून, पर्यावरण संरक्षणासाठी कठोर उपाययोजना व्हाव्यात, अशी मागणी केली जात आहे. अनधिकृत उत्खनन रोखण्यासाठी भविष्यात अधिक दक्षता घेतली जाणार असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या दंडात्मक कारवाईमुळे सुधागडमध्ये बेकायदेशीर उत्खननाला आळा बसेल का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
सुधागड तालुक्यात 13 अनाधिकृत उत्खनन प्रकरणांवर 22 लाख 83 हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच, एप्रिल 2025 पासून रॉयल्टी वसुली 21 लाख रुपये करण्यात आली असून, सन 2024-25 या आर्थिक वर्षात 1 कोटी 87 लाख रुपयांची रॉयल्टी वसुली करण्यात आली आहे. सध्या तालुक्यात अनधिकृत उत्खनन किती ठिकाणी सुरू आहे याची तपासणी केली जात असून, अनधिकृतपणे उत्खनन करणार्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.
– उत्तम कुंभार, तहसीलदार, सुधागड-पाली