कर्जत रेल्वे पोलिसांची कारवाई
| नेरळ | प्रतिनिधी |
मुंबई येथून पुण्याकडे जाणार्या एलटीटी-चेन्नई एक्स्प्रेसमधून लहान बालकांची वाहतूक सुरू होती. मदरसा शिक्षक त्या मुलांना बिहार येथून कर्नाटक येथे घेऊन चालला होता. मात्र, त्या मदरसा शिक्षकाच्या हालचाली संशयास्पद आढळून आल्याने त्या सर्व 29 बालकांना कर्जत स्थानकात उतरविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांच्या आदेशाने ही कारवाई केली आहे.
मध्य रेल्वे वरील कुर्ला स्थानकावरून सुटलेल्या एलटिटि-चेन्नई एक्सप्रेस गाडीच्या पहिल्या सर्वसाधारण डब्यातुन शुक्रवारी (दि.18) एक व्यक्ती आपल्या सोबत 29 बालकांना घेऊन जात असल्याचे आढळून आले होते. त्याबाबतची माहिती कर्जत रेल्वे पोलिसांना मिळाली असता ही गाडी कर्जत स्थानकात आल्यावर रेल्वे पोलीसांनी या गाडीच्या पहिल्या डब्यात प्रवास करणार्या बालकांची चौकशी सुरू केली. त्या बालकांना कर्नाटक मोहम्मद जलालउद्दीन मोहम्मद फिदा हुसेन सिद्दीकी (28) ही व्यक्ती कर्नाटक येथे घेऊन जात होती. हि व्यक्ती पेशाने एक मदरसा शिक्षक आहे. त्यांच्यासोबत निघालेली ही सर्व बालके बिहार राज्यातील जोकी पोस्ट ब्लॉक येथील असल्याचे निष्पन्न झाले आणि त्या सर्व बालकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्यात आला. मात्र, मदरसा शिक्षकाच्या संशयास्पद हालचालींमुळे रेल्वे पोलिसांनी त्या 29 बालकांना कर्जत स्थानकात उतरवून घेतले आणि अधिक चौकशीसाठी पोलीस चौकीत नेले.
त्या बालकांना घेऊन जाणार्या मो. जलालउद्दीन मो. फिदा हुसेन सिद्दीकीची अधिकी चौकशी केली असता तो एक मदरसा शिक्षक असून बिहार राज्यातील अररिया जिल्ह्यातील रहिवासी असल्याचे निष्पन्न झाले. तसेच, ही 29 मुले देखील त्याच्या आसपासच्या गावांतील असून त्याच्या नातेवाईकांचीच मुले आहेत. त्यांना घेऊन तो रायचुर-कर्नाटक येथील मदरसामध्ये कुराण शरीफ व उर्दू भाषेच्या शिक्षणाकरिता घेऊन जात असल्याचे त्याने सांगितले. त्याप्रमाणे या 29 बालकांच्या नातेवाईकांशी संपर्क साधुन खात्री करण्यात आलेली आहे. तरी देखील ताब्यात घेतलेल्या बालकांना त्यांची रितसर वैद्यकीय तपासणी करून काळजी व संरक्षणार्थ कर्जतमधील बालगृहात सुरक्षित ठेवण्यात आलेले आहे. त्यांच्यावर कर्जत पोलीस लक्ष ठेवून आहेत. लोहमार्ग पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे तसेच उपयुक्त मनोज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कर्जतचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तानाजी खाडे, पोलीस निरीक्षक मुकेश ढगे यांच्या पथकाने ही कारवाई केली असून, अधिक तपास सुरू आहे. त्या मुलांना घरातून फसवून आणले होते का? त्या मुलांना कुठे नेले जात होते? याबद्दल संशय निर्माण झाल्याने रेल्वे पोलिसांनी ही कारवाई केली आहे.