इराणी कप स्पर्धेत सामील होणार
। नवी दिल्ली । वृत्तसंस्था ।
भारत विरुद्ध बांगलादेश संघातील सामन्यादरम्यानच बीसीसीआयने सर्फराज खान, ध्रुव जुरेल आणि यश दयाल यांना भारतीय संघातून मुक्त केले आहे. हे तिघेही बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघाचा भाग होते. मात्र, त्यांना प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळण्याची संधी मिळालेली नाही. यामुळे या तिघांनाही 1 ऑक्टोबरपासून लखनौला सुरू होणार्या इराणी कप स्पर्धेसाठी मुक्त करण्यात आले आहे. यामुळे आता इराणी कप स्पर्धेत सर्फराज मुंबईकडून खेळताना दिसू शकतो, तर ध्रुव जुरेल आणि यश दयाल शेष भारतीय संघाकडून खेळताना दिसू शकतात.
खरंतर यापूर्वीच सर्फराजचा मुंबई संघात, तर ध्रुव जुरेल आणि यश दयालचा शेष भारत संघात समावेश करण्यात आलेला होता. परंतु, त्यांची उपलब्धता भारतीय संघ त्यांना मुक्त करणार की नाही यावर अवलंबून होती. आता त्यांना मुक्त केले असल्याने ते इराणी कप सामन्यात सामील होऊ शकतात. इराणी कप स्पर्धेचा सामना 1 ते 5 ऑक्टोबर दरम्यान लखनौमधील भारतरत्न श्री अटल बिहारी वाजपेयी एकाना क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे. हा सामना रणजी ट्रॉफी 2023-24 स्पर्धेचे विजेते मुंबई आणि शेष भारत या संघात होणार आहे. इराणी कप स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणाही झाली असून मुंबईचे नेतृत्व अजिंक्य रहाणे करणार आहे. रहाणेच्या नेतृत्वातच मुंबईने रणजी ट्रॉफी 2023-24 जिंकली होती. तसेच, इराणी कप 2024 स्पर्धेसाठी शेष भारत संघाचे नेतृत्व ऋतुराज गायकवाड याच्याकडे देण्यात आले आहे.