वर्षा टोळ
भारतात लहान मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचारांचं प्रमाण खूप जास्त आहे. हे प्रकार वाढत चालल्याने मुलांचं समुपदेशन केलं जातं. मात्र यात सगळी जबाबदारी मुलांवरच टाकली जाते. हे लक्षात आल्यानंतर आम्ही प्राथमिक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन ठेऊन एक प्रकल्प राबवायला सुरूवात केली. पुण्याच्या केईएम रुग्णालयात या आजारावर उपचार उपलब्ध झाले. आता लोक या आजाराबाबत बोलू लागले आहेत, पुढे येत आहेत.
मी पुण्याच्या केईएम हॉस्पिटल डिस्ट्रेस सेंटर या संशोधन संस्थेत गेल्या वीस वर्षांपासून वरिष्ठ सल्लागार म्हणून कार्यरत आहे. या संशोधन संस्थेत 2015 पासून आम्ही एक आगळावेगळा प्रकल्प राबवायला सुरूवात केली. लहान मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचारांशी संबंधित असा हा प्रकल्प आहे. आपल्या देशात लहान मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचारांचं प्रमाण बरंच जास्त असून ही आजघडीची खूप मोठी सामाजिक समस्या आहे. मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचाराची प्रत्येक घटना उघडकीस येतेच, असं नाही. तसंच भारतासारख्या समाजिक आणि सांस्कृतिक विविधता असणार्या देशात या विषयावर बोलणं तसंच हा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचवणं हे खरं तर खूप मोठं आव्हान ठरतं. अनेक प्रकरणांमध्ये घरातली किंवा ओळखीची व्यक्ती सहभागी असते. त्यामुळे याबाबत फारशी वाच्यता होताना दिसत नाही. सर्वसाधारणपणे आपल्याकडे बळी पडलेल्या व्यक्तीला सल्ले देण्याचे प्रकार होताना दिसतात. लहान मुलांना शाळांमध्येही चांगल्या आणि वाईट उद्देशाने केलेला स्पर्श कसा ओळखायचा हे सांगितलं जातं. आम्हीही त्या दिशेने काम करायला सुरूवात केली. मात्र आमच्या असं लक्षात आलं की, अशा परिस्थिीत सावध राहण्याची सगळी जबाबदारी लहान मुलांवर टाकली जाते. त्यांना खबरदारी घ्यायला सांगितलं जातं. विशेषत: शहरी भागात शाळांमध्ये मुलांना खबरदारी घ्यायला सांगितलं जाऊ लागलं. घरीही पालक मुलांना सूचना करू लागले. त्यामुळे आपण नेमकं काय करायचं, याबाबत मुलांचा गोंधळ उडतो.
आपल्याकडे मुलं नात्यातल्या आणि ओळखीच्या लोकांशी अगदी सहज बोलतात. त्यांना प्रत्येकापासून दूर ठेवणं शक्य होत नाही. या सगळ्याचा मुलांवर खूप ताण येत असल्याची बाब आमच्या लक्षात आली. मुलांवर लैेंगिक अत्याचार झाल्यानंतर त्याचे त्यांच्या शारीरिक, मानसिक आणि सामाजिक पातळीवर खूप दूरगामी परिणाम होतात. हे सगळं लक्षात घेऊन जबाबदारीचं ओझं मुलांवर न टाकता लैंगिक अत्याचारांचं प्रमाण कमी करण्याचं दीर्घकालीन उद्दिष्ट नजरेसमोर ठेऊन आम्ही प्राथमिक प्रतिबंधात्मक दृष्टीकोन ठेऊन हा प्रकल्प राबवायला सुरूवात केली. या प्राथमिक प्रतिबंधात्मक दृष्टीकोनाअंतर्गत आम्ही पिडोफिलिया हा आजार असणार्या लोकांसोबत काम करायला सुरूवात केली. पिडोफिलिया हा लैंगिक भावभावनांशी संबंधित आजार असून मेंदूत होणार्या काही बदलांमुळे पिडोफिलिया बाधित व्यक्तीला लहान मुलांबाबत लैंगिक आकर्षण वाटू लागतं. या व्याधीने ग्रस्त लोकांचं समुपदेशन करून त्यांच्यावर योग्य ते उपचार करण्यात आले तर लहान मुलांवरील अत्याचारांचं प्रमाण कमी होऊ शकेल, असा विचार करून या व्याधीवर उपचार द्यायला सुरूवात केली. भारतात हे पहिल्यांदाच घडत होतं. यामुळे लहान मुलांवर होणार्या लैंगिक अत्याचारांना प्रतिबंध करणं शक्य होतंच शिवाय एखाद्या व्यक्तीला गुन्हेगार बनण्यापासून रोखताही येतं.
भारतासारख्या देशात लैंगिक संबंध, लहान मुलांवर होणारे लैंगिक अत्याचार, लैंगिक आकर्षण, समलैंगिक संबंध आदी विषयांवर उघडपणे बोललं जात नाही. म्हणावी तितकी जागरूकता निर्माण झालेली नाही आणि यामुळेच अशा पद्धतीचे गुन्हे आपल्या देशात घडताना दिसतात. भारतामध्ये अशा पद्धतीचा उपक्रम राबवण्याबाबतचा प्रस्ताव बर्लिन इथल्या शॅरिटी विद्यापीठाने आमच्यापुढे ठेवला. या विद्यापीठाकडून जर्मनीमध्ये मागील पंधरा वर्षांपासून अशा प्रकारचा उपक्रम राबवला जात आहे. आमच्याकडे हा प्रस्ताव आल्यानंतर विचारमंथन करण्यात आलं. पाश्चिमात्य किंवा अन्य देशांमध्ये राबवला जाणारा कोणताही प्रकल्प आपल्या देशात जसाच्या तसा रावबता येत नाही. आपल्याकडची संस्कृती, विचारसरणी, सामाजिक जाणीवा, अन्य समस्या त्या देशांपेक्षा खूपच वेगळ्या आहेत. पिडोफिलिया नावाचा एखादा आजार असतो, हे आपल्याकडे स्वीकारलं जाईल किंवा नाही, याबाबतच मुळात साशंकता होती. त्यातच गुन्हेगार व्यक्तीला शिक्षा झालीच पाहिजे, असाही एक मतप्रवाह आपल्याकडे पहायला मिळतो. मात्र पिडोफिलियाग्रस्त व्यक्तीला नैसर्गिकरित्याच लहान मुलांबाबत लैंगिक आकर्षण वाटतं. त्यामुळे यातून बाहेर पडण्याची, किंबहुना या समस्येवर नियंत्रण मिळवण्याची इच्छा असणार्या रुग्णांसाठी उपचार उपलब्ध करून देणंही तितकंच गरजेचं होतं.
पिडोफिलिया हा आजार पूर्णपणे बरा होत नाही. पण योग्य उपचारांनी त्यावर नक्कीच नियंत्रण मिळवता येऊ शकतं आणि असं नियंत्रण मिळवल्यानंतर संबंधित व्यक्ती सर्वसामान्य वैवाहिक आयुष्य जगू शकते. या व्यक्ती मुलांचे पालकही होऊ शकतात. मात्र याबाबत जागरूकता निर्माण करणं अत्यंत आवश्यक होतं. जर्मनीतलं मॉडेल आपल्याकडे तंतोतंत लागू करता येणार नसल्यामुळे आम्ही मानसोपचार, समुपदेशन क्षेत्रातल्या तज्ज्ञ मंडळींची एक टीम तयार केली. मानसोपचार तज्ज्ञ डॉ. परळीकर, सेक्सॉलॉजीस्ट डॉ. उज्ज्वल नेने, डॉ. लैला गार्डा ही तज्ज्ञ मंडळी आमच्या टीमचा भाग आहेत. या प्रकल्पाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी माझ्याकडे होती. हा प्रकल्प राबवण्यासाठी आम्ही या विषयावर काम करणार्या पुण्यातल्या काही लोकांशी संपर्क साधला आणि एक समिती तयार केली. त्यात अॅडव्होकेट हेमंत चव्हाण, डॉ. मोहन आगाशे, माजी खासदार प्रदीप रावत आदींचा समावेश करण्यात आला. हा प्रकल्प राबवण्यासाठी साधारण वर्षभर आम्ही चाचपणी केली, अभ्यास केला. त्यासाठी सेवाभावी संस्थांचे प्रतिनिधी, विविध शाळांचे प्रतिनिधी, पालक, मानसोपचार तज्ज्ञ, समुपदेशक, पोलीस, वकील यांच्यासोबत कार्यशाळांचं आयोजन केालं. प्रशिक्षण वर्गही घेण्यात आले. पिडोफिलियाबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर जागरूकता अभियान राबवलं.
आम्ही 50 सेकंदांचे छोटेखानी स्पॉट्स तयार केले आणि मुंबई, पुणे, नाशिकच्या मल्टीप्लेक्समध्ये चित्रपटादरम्यान दाखवले. हॉटलाईन क्रमांक उपलब्ध करून दिला. या क्रमांकावर भारतातून कोणतीही व्यक्ती संपर्क साधू शकते. फोन करणार्या व्यक्तीची माहिती पूर्णपणे गुप्त ठेवण्यात येते. वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही जागरूकता निर्माण करत असतो. पिडोफिलिया ग्रस्त व्यक्ती चाईल्ड पोर्नोग्राफीमध्येही सहभागी असू शकत असल्याने त्या अनुषंगाने जागरूकता निर्माण केली. ‘डोंट ऑफेंड इंडिया’ हे आमचं फेसबुक फेज आहे. आम्ही ट्विटर, इन्स्टावरही आहोत. अशा मोहिमा राबवल्यानंतर आम्हाला व्याधीग्रस्तांचे फोन येऊ लागले. आम्ही रिक्षाच्या मागे पोस्टर्स लावली, रेडियोवरून लोकांना माहिती दिली. झूम तसंच अन्य माध्यमातून ऑनलाईन जागरूकता अभियान राबवल्यामुळे आम्ही अनेक राज्यांमध्येही पोहचू शकलो. या सगळ्याचा सकारात्मक परिणाम दिसून आला. 2022 पर्यंत आमच्या हॉटलाईनवर शेकडो फोनकॉल्स आले.
या आजाराबाबत बोलण्यासाठी माणसं पुढे येत आहेत, ही बाब खूप महत्त्वाची आहे. या सगळ्या प्रवासात आम्हाला कुठेही नकारात्मक अनुभव आले नाहीत, कोणताही विरोध झाला नाही. आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आम्ही जर्मन टीमसोबत एक ऑनलाईन टूलही तयार केलं. हे सेल्फ मॅनेजमेंट टूल असून आमच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. हे टूल आधी इंग्रजीमध्ये उपलब्ध करून दिलं गेलं आणि त्यानंतर त्याचं मराठी आणि हिंदीमध्येही भाषांतर करण्यात आलं. ‘ट्रबल्ड डिझायर्ड डॉट कॉम’ असं या टूलचं नाव आहे. आत्तापर्यंत देशातल्या दहा ते बारा हजार लोकांनी हे टूल वापरलं आहे. प्रत्यक्षात समोर येण्याची इच्छा नसणारे या टूलचा वापर करू शकतात. मी नुकतीच बर्लिनमध्ये एका आंतरराष्ट्रीय परिषदेत सहभागी झाले होते. मानसिक आरोग्य या विषयावर काम करणारे विविध देशांमधले लोक या परिषदेत सहभागी झाले होते. तिथे मी आमच्या प्रकल्पाचं सादरीकरण केलं. त्यामुळे आता या प्रकल्पाला आंतरराष्ट्रीय स्तरावरही ओळख मिळाली. भारतात अशा प्रकारचं काम सुरू असल्याची बाब आंतरराष्ट्रीय पातळीवरही अधोरेखित होत आहे. ‘डोंट ऑफेंड इंडिया’ हा आमचा उपक्रम आता विविध देशांमध्येही राबवला जातो. हा प्रकल्प देशभरात नेण्यासाठी आम्ही 21 थेरपिस्टना प्रशिक्षण दिलं आहे. अर्थात ही दीर्घकालीन प्रक्रिया असेल. अपेक्षित बदल घडण्यासाठी किंवा जागरूकता निर्माण होण्यासाठी बराच काळ जावा लागणार आहे. पण हळूहळू का होईना, पिडोफिलियाबाबत जागरूकता निर्माण होत आहे, ही समाधानकारक बाब आहे.