। रत्नागिरी । प्रतिनिधी ।
गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी आणि पर्यटनासाठी आलेल्या कोल्हापूरमधील एका व्यक्तीचा वॉटर स्पोर्ट्स करताना समुद्रात बुडून मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी (दि. 24) सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास घडली. सुरेश जेठानंद जेवरानी (वय 49, रा. ताराबाई पार्क, कापसेमाळ, जि. कोल्हापूर) असे दुर्घटनेतील मृत पर्यटकाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरेश जेवरानी हे त्यांच्या कुटुंबीयांसोबत गणपतीपुळे येथे आले होते. ते, त्यांची पत्नी आणि आई समुद्रकिनारी बसले असताना सुरेश जेवरानी यांनी एकटेच लाईफ जॅकेट घालून ड्रॅगन राईड या वॉटर स्पोर्ट्समध्ये सहभाग घेतला. समुद्रात असताना पाण्याची मोठी लाट त्यांच्या ड्रॅगनला धडकली, त्यामुळे त्यांचा ड्रॅगनवरीलचा हात सुटला आणि ते पाण्यात पडले. तेथे उपस्थित असलेल्या जीवरक्षकांनी त्यांना तातडीने समुद्रातून बाहेर काढले आणि उपचारासाठी मालगुंड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या घटनेची नोंद जयगड पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करीत आहेत.