। खेड । प्रतिनिधी ।
खेड तालुक्यातील कुळवंडी ग्रामपंचायत हद्दीत माझी वसुंधरा अभियान 5.0 अंतर्गत पशुपक्ष्यांसाठी मोक्याच्या ठिकाणी पाणवठ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे रणरणत्या उन्हात कासावीस होणार्या पशुपक्ष्यांची पाण्याची चिंता मिटवण्याचा ग्रामस्थांनी कसोशीचा प्रयत्न केला आहे.
महाराष्ट्र दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयाच्या पटांगणात ग्रामस्थांच्या उपस्थितीत ध्वजारोहण झाल्यानंतर माझी वसुंधरा अभियानांतर्गत निर्माण केलेले पाणवठे खुले करण्यात आले. गावातील पुरातन मंदिरे, बसथांबे याठिकाणी पाणवठ्यांसह गावासंदर्भातील महत्त्वाची माहिती देणार्या फलकांचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी सरपंच विष्णु निकम, उपसरपंच संचिता जाधव, माजी सरपंच दिलीप निकम, सामाजिक कार्यकर्ते संतोष खोपकर, दगड्डू निकम यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, पोलीस पाटील, शिक्षक, अंगणवाडी सेविका, तलाठी उपस्थित होते.