रेवदंडा पोलिसांकडून बडदास्त
| चौल | प्रतिनिधी |
नाशिकवरुन आलेल्या पर्यटकांनी चौल-भाटगल्ली येथील पितापुत्राला मारहाण केल्याची घटना सोमवारी (दि. 6) सकाळी साडेअकरा वाजताच्या सुमारास घडली. अरुण घरत आणि सुयोग घरत अशी मारहाण झालेल्यांची नावे आहेत. त्यानंतर मोठा वादाचा प्रसंग याठिकाणी ओढावला होता. राजकीय वरदहस्त असलेल्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांकडून घटनास्थळी अरेरावीची भाषा करण्यात येत होती. हा वाद शेवटी रेवदंडा पोलीस ठाण्यात गेला. पोलीस ठाण्यात पर्यटकांना पिझ्झा बर्गर मागवत त्यांची चांगली बडदास्त राखण्यात आल्याचा दावा घरत पितापुत्रांनी केला आहे. दरम्यान, या आरोपाचे रेवदंडा पोलिसांकडून खंडन करण्यात आले आहे. जवळपास दहा तासांनंतर रात्री उशिरा या घटनेत परस्परांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत हकीकत अशी की, चौल-भाटगल्ली येथे अरुण घरत यांचे सिमेंट व अन्य मटेरियल सप्लायर्सचे दुकान आहे. त्यांचा मुलगा सुयोग सकाळी साडेदहाच्या सुमारास चौल-सागमळा येथे सिमेंटच्या गोणी टेम्पोतून घेऊन जात होता. त्याचा टेम्पो सागमळा एस नाईक आळी येथे आला असता, रेवदंडा बाजूकडून अलिबाकडे जात असलेल्या मागून येणार्या नाशिक पंचवटी येथील पर्यटकांच्या गाडीने टेम्पोला जोरदार ठोकर दिली. सदर गाडी दीपाली स्वप्नील वानखेडे या चालवत असल्याचा दावा सुयोग घरत याने केला आहे. गाडीतील महिला चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले. स्वतःच्या चुकीने अपघात झाला असतानाही पर्यटक माझ्यावर अरेरावी करु लागले. गाडीत बसलेल्या अन्य लोकांनी मला मारहाण केली. मी तात्काळ वडील अरुण घरत यांना घटनास्थळी बोलावले. ते येताच पर्यटक महिला आणि पुरुषांनी काहीही ऐकून न घेता आम्हा दोघांना हाताबुक्क्यांनी जोरदार मारहाण केली, असा आरोपही सुयोग घरत याने केला आहे. या मारहाणीत अरुण घरत जखमी झाले असून, त्यांना तात्काळ रेवदंडा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारार्थ दाखल करण्यात आले. या मारहाणीत वडिलांची सोन्याची चैन गहाळ झाल्याची माहिती सुयोगने दिली.
दरम्यान, हा अपघात घडल्यानंतर मोठ्या प्रमाणात सागमळा येथे वाहतूक कोंडी झाली होती. रेवंदडा पोलिसांना तात्काळ हस्तक्षेप करीत वाहतूक सुरळीत केली. त्यानंतर दोन्ही गटातील लोकांना पोलीस ठाण्यात हजर केले. पर्यटकांना राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्यासाठी मंत्रालयातून फोन करुन पोलिसांवर दबाव टाकण्यात आल्याने पोलीस गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ करीत होते, असा आरोप घरत पितापुत्राकडून करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे दुपारी बाराच्या दरम्यान घटना घडल्यानंतर पोलीस ठाण्यात जवळपास रात्री दहा वाजताच्या दरम्यान गुन्हा दाखल करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यानच्या काळात पोलिसांकडून घरत आणि त्यांच्यासोबत असलेल्या इतर व्यक्तींना अरेरावीची भाषा वापरुन पर्यटकांना गोंजारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही करण्यात येत आहे. परंतु, पोलिसांनी हे सर्व आरोप फेटाळले असून, दोन्ही बाजूच्या लोकांना परस्परात सामंजस्यातून वाद मिटवण्याचे आवाहन केल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पोलिसांनी पर्यटकांना पिझ्झा बर्गर आणून देण्याची परवानगी दिलीच कशी, असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. पोलिसांकडून सामान्य आरोपींना अशी वागणूक कधी दिली जाते का? पिझ्झा बर्गर पोलीस ठाण्यात आणले जात असताना बघ्याची भूमिका घेणार्या रेवदंडा पोलिसांच्या कार्यप्रणालीवर संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, या घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत किरवले यांच्या मार्गदशर्नाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल महेंद्र राठोड करीत आहेत.
दहा तास आणि बारा पिझ्झा
आरोपींसाठी अलिबाग येथील डॉमिनोझमधून रात्रीच्या सुमारास पंधरा पिझ्झा बर्गर डिलिव्हरी बॉय घेऊन आल्याची माहिती घरत आणि त्यांच्यासोबत असलेले नातेवाईक आणि मित्रमंडळींनी दिली. दरम्यान, साडेअकाराच्या सुमारास झालेल्या अपघाताबाबत गुन्हा दाखल करण्यास जवळपास दहा तास का लागले, याबाबत प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. आरोपींना राजकीय वरहस्त असल्याने मंत्रालयातून त्यांच्यासाठी पोलिसांना फोन येत होते, अशी चर्चा पोलीस ठाण्याच्या परिसरात रंगली होती.
दोन्ही पार्ट्यांमध्ये आपसात याविषयी चर्चा सुरू होती. परंतु, प्रकरण न मिटल्याने शेवटी रात्री उशिराने दोन्ही बाजूकडील लोकांवर परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले आहेत. पोलिसांकडून कोणाचीही बाजू घेण्यात आलेली नाही. त्याचप्रमाणे पर्यटकांसोबत लहान मुले असल्याने त्यांनी त्यांच्यासाठी वडापाव आणले होते. पिझ्झा बर्गर पोलीस ठाण्यात आणले नाहीत.
श्रीकांत किरवले,
सहाय्यक पोलीस निरीक्षक, रेवदंडा पोलीस ठाणे
मला व माझ्या वडिलांना पर्यटक महिला व पुरुषांकडून हाताबुक्क्याने मारहाण करण्यात आली आहे. पोलीस ठाण्यात माझ्यासोबत गेलेल्या नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या अंगावर पोलीस ओरडून भीती दाखवण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र, पर्यटकांची चांगली बडदास्त राखली जात होती. पोलिसांच्या कार्यपद्धती संशयास्पद वाटते.
सुयोग घरत,
तक्रारदार, चौल
आरोपींवर गुन्हा
कारमध्ये आलेल्या कुणाल त्रंबक पाटील, स्वप्नील धोंडीराम पाटील, चंद्रकांत रामदास पाटील, ललीत रामदास पाटील, दिपाली स्वप्नील वानखेडे, कांचन ललीत पाटील, वैष्णवी महेंद्र देसले, वैशाली कुणाल पाटील, शीतल राकेश खैरनार सर्व रा. पंचवटी, नाशिक येथील पर्यटकांनी मारहाण केल्याची तक्रार रेवदंडा पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.