| रायगड | जिल्हा प्रतिनिधी |
अलिबाग-वडखळ मार्गावर कायमच वाहतूक कोंडीचे संकट निर्माण होत असल्याचे चित्र शनिवारी दुपारी दिसून आले. सुट्टीचा आनंद लुटण्यासाठी अलिबागकडे येणाऱ्या पर्यटकांना या रस्त्यावर वाहतूक कोंडीशी सामना करावा लागला. वीस मिनिटांच्या प्रवासासाठी तब्बल दीड तास खोळंबा झाला. त्यामुळे प्रवाशांसह पर्यटकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत. या मार्गावरील कोंडीमुळे प्रवासी त्रस्त झाल्याचे दिसून आले.
रायगड जिल्हा पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरत आहे. दिवाळी, थर्टी फर्स्ट व अन्य सणासुदीच्या कालावधीत पर्यटक रायगडमध्ये दाखल होत असतात. परंतु, अलिबाग हे पर्यटनाच्या दृष्टीने फारच आवडीचे क्षेत्र ठरत असल्याने या ठिकाणी फिरण्यास येणाऱ्या पर्यटकांची संख्याही प्रचंड वाढत आहे. आता दर आठवड्याला पर्यटक रायगड जिल्ह्यात येत आहेत.
अलिबाग-वडखळ रस्ता हा रायगड जिल्ह्याच्या मुख्यालयाला जोडणारा प्रमुख रस्ता आहे. पर्यटन क्षेत्र असलेल्या अलिबाग, मुरुडकडे जाण्यासाठीदेखील हा महत्त्वपूर्ण रस्ता आहे. याच मार्गावरुन अलिबाग, मुरुडकडे मोठ्या प्रमाणावर अवजड वाहतूक सुुरु असते. अरुंद असलेल्या या रस्त्यावर अवजड वाहतुकीमुळे प्रचंड वाहतूक कोंडी होण्याचे प्रकार वारंवार घडत आहेत. या रस्त्याबाबात अनेकवेळा आवाज उठविण्यात आला आहे. मात्र, कसलेही सोयरसुतक नसलेल्या प्रशासनाने याकडे नेहमीच सोयीस्कररित्या दुर्लक्ष करण्यातच धन्यता मानली असल्याचे चित्र आहे. याच मार्गावरुन पर्यटक, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक कार्यालय, जिल्हा परिषद तसेच जिल्हा रुग्णालयात नागरिकांची नेहमी ये-जा असते. त्यामुळे हा मार्ग अतिशय महत्त्वाचा मानला जातो. अलिबाग-वडखळ रस्त्यावरून दिवसाला हजारो वाहनांचा ये-असते. मात्र, या रस्त्याच्या दुरुस्तीसह रुंदीकरणाकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याने त्याचा फटका प्रवाशांसह पर्यटकांना बसत आहे.
शनिवार व रविवारी साप्ताहिक सुट्टीचा आनंद घेण्यासाठी पर्यटक शनिवारी सकाळपासून रायगड जिल्ह्यात दाखल झाले आहेत. शनिवारी दुपारी वडखळगहून अलिबागकडे येत असताना, प्रवाशांसह पर्यटकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागला. वाहतूक कोंडीमुळे दोन्ही बाजूला वाहनांच्या रांगाच रांगा लागल्या होत्या. अलिबाग-वडखळ हा 23 किलोमीटर रस्ता पार करण्यासाठी 20 मिनिटांचा कालावधी लागतो. मात्र, वाहतूक कोंडीमुळे या 20 मिनिटांच्या प्रवासासाठी दीड ते दोन तासांचा खोळंबा झाल्याचे दिसून आले. ही वाहतूक कोंडी सोडविताना वाहतूक पोलिसांची दमछाक उडाली. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत वाहन चालविणाऱ्यांनादेखील यावेळी वाहतूक पोलिसांनी दणका दिला.
अलिबाग-वडखळ हा अरुंद रस्ता आहे. वाहनांची वर्दळ या रस्त्यावर दिवसेंदिवस वाढत आहे. काही वाहन चालक ओव्हरटेक करीत असल्याने वाहतूक कोंडी निर्माण होते. हा प्रश्न आता कायमचा मार्गी लावण्यासाठी अलिबाग-वडखळ रस्ता ‘नो ओव्हरटेक झोन’ करण्याचा प्रयत्न आहे. एका रांगेत वाहने धावल्यास वाहतूक कोंडीचा प्रश्न सुटण्यास मदत होईल.
– अभिजीत भुजबळ, पोलीस निरीक्षक, जिल्हा वाहतूक शाखा





