प्रत्येक मशीनद्वारे दहा कारवाई करण्याचे आदेश
। अलिबाग । प्रमोद जाधव ।
मशीनद्वारे दंडात्मक कारवाई करण्यास वाहतूक पोलीस कमी पडले आहेत. ‘टार्गेट’नुसार कारवाई करण्यास ते अपयशी ठरले आहेत. त्यामुळे हे टार्गेट पूर्ण करण्यासाठी जिल्ह्यातील वाहतूक पोलीस कामाला लागले असल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून मिळाली आहे. प्रत्येक मशीनद्वारे दहा कारवाया पूर्ण करण्यासाठी वाहतूक पोलीस रस्त्यावर उभे राहू लागले आहेत.
जिल्हा वाहतूक शाखेमार्फत जिल्ह्यातील वाहतूक कोंडी व वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्यांवर अंकुश ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. जिल्हा वाहतूक शाखा एक स्वतंत्र यंत्रणा आहे. पोलीस निरीक्षक यांच्या नेतृत्वाखाली जिल्ह्यातील वाहतूक नियंत्रणाचा कारभार पाहिला जातो. जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा वाहतूक शाखा आहे. या वाहतूक शाखेमार्फत बेशिस्त चालकांना शिस्त लावण्याचा प्रयत्न कारवाईच्या माध्यमातून केला जातो. पोलीस निरीक्षक कारवाईचा आढावा नेहमी घेत असतात. दंडात्मक कारवाई करण्यासाठी प्रत्येक वाहतूक पोलिसांना एक मशीन दिली आहे. या मशीनद्वारे फोटो काढून ऑनलाईन दंडात्मक कारवाई केली जाते. परंतु, अलिबागसह काही पोलीस ठाण्यातील हद्दीतील वाहतूक पोलिसांनी फक्त एकच टक्के ऑनलाईन दंडात्मक कारवाई केल्याचा ठपका वरिष्ठांनी ठेवला आहे. प्रत्येक मशीनद्वारे दहा जणांवर कारवाई करावे, अशा सूचना असतानाही ही कारवाई समाधानकारक दिसून आली नाही. त्यामुळे काही वाहतूक पोलिसांच्या कारवाईबाबत वरिष्ठांनी नाराजी व्यक्त केल्याची माहिती खात्रीशीर सूत्रांकडून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलीस कर्मचारी टार्गेट पूर्ण करण्यासाठी कामाला लागले आहेत. वाहतूक पोलीस वरिष्ठांच्या टार्गेटवर आल्याने कर्मचार्यांची कारवाईसाठी धावाधाव सुरु झाली आहे. प्रत्येकजण टार्गेट पूर्ण करण्यासाठी नाक्या-नाक्यावर उभे राहून चालकांविरोधात कारवाई करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. या कारवाईबाबत अनेकांकडून नाराजीचे सूर उमटत आहेत.