कामगारांसाठी प्रशिक्षण शिबीर

। महाड । वार्ताहर ।
राज्यातील कामगारांना न्याय देणार्‍या कामगार उत्कर्ष सभेच्या माध्यमातून महाड औद्योगिक वसाहतीमध्ये एमएमएच्या सिईटीपी सभागृहात गेल्या दोन दिवसापासून एमआरए या पाचगणी येथील संस्थेच्या मार्गदर्शनाखाली कामगार आणि व्यवस्थापन यांच्यासाठी प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षण शिबिर समारंभ कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाडच्या नगराध्यक्ष स्नेहल माणिक जगताप उपस्थित होत्या. नगराध्यक्ष म्हणाल्या की, असे प्रशिक्षण व्हावे, माझा कामगार प्रशिक्षित व्हावा अशी मा.आम.स्व.माणिकराव जगताप यांची प्रबळ इच्छा होती. नगराध्यक्ष स्नेहल जगताप यांच्या भाषणाचा धागा पकडून कामगार सभेचे अध्यक्ष जीतू जोशी म्हणाले की, माणिकराव मला वारंवार या शिबिराबाबत विचारणा करत असत. आज त्यांचे ते स्वप्न मी पूर्ण केले याचे निश्‍चितच मला समाधान आहे. शेवटी नवनीत साळवी यांनी सर्वांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी भाऊ दिविलकर, गावकर, दळवी, दिवाकर सावंत सर्व युनिट अध्यक्ष व पदाधिकारी यांनी सहकार्य केले.

Exit mobile version