विक्रीच्या नावाखाली अतिक्रमण

नर्सरी चालकांचे पालिका हद्दीतील भूखंडावर बस्तान; कारवाई होत नसल्याने नागरिकांकडून आश्‍चर्य व्यक्त

| पनवेल | प्रतिनिधी |

शोभेची झाडे विकण्याच्या नावावर पालिका हद्दीतील अनेक मोकळ्या भूखंडावर विक्रेत्यांकडून अतिक्रमण करण्यात आले आहे. या ठिकाणी कोणत्याही परवानगीशिवाय हे विक्रेते फुल झाडांसोबत फळ झाडे, बी बियाणे, खत आणि मातीची विक्री करत असतानाही कृषी विभाग, महसूल विभाग तसेच पालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून कोणतीही कारवाई होत नसल्याने अनेकांकडून आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

घरातील सज्जात कुंड्यामध्ये शोभेची आणि भाजी फुलांची झाडे लावण्याची हौस अनेकांना असते. परिसरातीतील रोप वाटिकांमध्ये विक्रीसाठी उलब्ध असलेली रोपटी विकत घेऊन ही हौस पूर्ण केली जात असली तरी परिसरात बेकायदेशीरपणे चालवण्यात येत असलेल्या रोपवाटिकांमध्ये विक्री करण्यात येणारी रोपटी कोणत्या प्रतीची आहेत याची कोणतीही खात्री न करता टवटवीत दिसणारी ही रोपटी घरी नेताच सुकून जात असल्याने अनेकांची फसवणूक होत असल्याचे सिद्ध होत आहे. पालिका हद्दीतील सिडकोच्या मोकळ्या भूखंडांचे पालिकेकडे हस्तांतराचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याचाच फायदा उचलत अशा मोकळ्या भूखंडावर अतिक्रमण करुन अनेकजण विविध प्रकारच्या वृक्षांची रोपटी विक्री करण्याचे काम करत आहेत. पालिका हद्दीत करण्यात आलेली ही अतिक्रमण सिडकोच्या भूखंडावर असल्याने पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथकातील कर्मचारी अशा बेकायदेशीर नर्सरीविरोधात कारवाई करण्यास धजावत नसल्याने नर्सरी चालकांचे फावले आहेत.

माती विक्री
बेकायदेशीरपणे नर्सरी चालवणारे रोपांसाठी लागणारी मातीचीदेखील विक्री करत आहेत. विकण्यासाठी आणण्यात आलेल्या मातीचे ढिगारे या नर्सरीमध्ये टाकलेले पाहायला मिळत आहेत. कोणत्याही प्रकारची माती विक्री करण्यासाठी व त्याची वाहतूक करण्यासाठी महसूल विभागाची परवानगी लागत असतानाही बेकायदेशीरपणे चालवण्यात येणार्‍या या नर्सरीमध्ये माती कुठून आणण्यात येत आहे. याची कोणतीही खातर जमा महसूल विभाग करताना दिसत नाही.

परवानगी अपेक्षित
मोठ्या संख्येने फळझाड अथवा बियाण्यांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाकडून परवानगी घेणे अपेक्षित असते. मात्र, पालिका हद्दीत फळझाडे आणि बी बियाणांच्या पाकिटांची विक्री करणार्‍यांकडे याबाबतची कोणतीही परवानगी नसल्याचे पाहायला मिळत आहे.

मोठ्या संख्येने फळ झाडे विक्री करायची असल्यास अथवा बी-बियाण्यांची विक्री करण्यासाठी कृषी विभागाची परवानगी घेणे अपेक्षित आहे. मात्र, शोभेची झाडे विकणार्‍यांना कोणत्याही प्रकारच्या परवानगीची गरज नाही.

शरद गिते, कृषी अधिकारी, पनवेल

नर्सरीवाले रोप जगवण्यासाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर करत असल्याने त्यांच्याकडील रोपे बहरलेली दिसतात. रोप घेणार्‍या नागरिकांना याबाबत माहिती नसल्याने अनेकदा ग्राहकांकडील रोपे हवी तेवढी बहरत नाहीत.

सचिन शिंदे, निसर्ग मित्र संस्था, पनवेल
Exit mobile version